झिरो टॉलरन्स’ धोरणाला मार्केट यार्ड पोलिसांची हरताळ; आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत अवैध धंदे जोमात
स्वारगेटपाठोपाठ आता मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या वसुली बहाद्दरांवर कधी पडणार कारवाईचा बडगा?

पुणे, महाराष्ट्र मिशन प्रतिनिधी : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे शहरातून गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ची कडक भूमिका घेत असून, अवैध धंद्यांना छुपा पाठबळ देणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत ‘ड्रग्स फ्री’ व नशामुक्त शहर करण्याचे स्पष्ट निर्देश देत गांभीर्याने काम करत आहेत. शहरात वाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या स्तरावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असताना दुसरीकडे, मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मात्र या सर्व नियमांना आणि आयुक्तांच्या आदेशांना चक्क केराची टोपली दाखवली जात असल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे कायद्याचे राज्य कागदावर उरले असून, खाकी वर्दीच्या छत्राखाली अवैध धंदेवाल्यांचे उघडपणे राज्य सुरू असल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आई माता मंदिराजवळ जुगाराची ‘स्ट्राँग रूम’ आणि मटक्याचा सुळसुळाट
स्वारगेटमधील कठोर कारवाईची चर्चा ताजी असतानाच, मार्केट यार्ड परिसरातील आई माता मंदिराजवळ वसुली दादांच्या जवळच्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सुरू केलेला पत्त्याचा क्लब आणि मटका जुगार अड्ड्याची ती ‘स्ट्राँग रूम’ सध्या प्रचंड जोमात सुरू आहे. या ठिकाणी जुगाराची जत्राच भरत असून, रोज सकाळी आणि संध्याकाळी जुगाराचा डाव खेळण्यासाठी जुगारांची मोठी झुंबड उडत असते. नागरिकांना उघडपणे हे सर्व अवैध प्रकार दिसत असताना स्थानिक पोलिसांना ते कसे दिसत नाहीत, याबाबत तीव्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मटका, गुटखा, दारू आणि गांजाची सर्रास विक्री
गेल्या काही महिन्यांपासून या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात केवळ जुगारच नव्हे, तर इतरही अनेक गंभीर अवैध धंद्यांनी पाय पसरले आहेत. मार्केट यार्ड परिसरात अनेक ठिकाणी राजरोसपणे मटका जुगार खेळवला जात आहे. शासनाकडून बंदी असलेला सुगंधित गुटखा आणि आरोग्याला अत्यंत घातक ठरणाऱ्या हातभट्टीच्या दारूची विक्रीही काही ठराविक ठिकाणी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करणारी गांजा विक्री देखील काही ठिकाणी विनाअथकपणे सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे परिसरात चोऱ्या, वादावादी, हाणामाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर डोके वर करत आहे.
पोलिसांचे थेट पाठबळ आणि ‘वसुली’चे रॅकेट
या वाढत्या अवैध धंद्यांवर मार्केट यार्ड पोलिसांकडून कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खळबळजनक माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशांना स्पष्टपणे तिलांजली देत, कौस्तुभ जाधव आणि किरण जाधव हे पोलीस कर्मचारी “डर के आगे जीत है” असे म्हणत आपले वसुलीचे कामकाज अत्यंत गतिमान आणि दक्ष राहून पार पाडत असल्याची चर्चा आहे. तसेच कोणत्या अवैध धंद्याला चालू ठेवायचे आणि कोणता धंदा बंद करायचा, याचे संपूर्ण नियंत्रण याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. खाकी वर्दीच्या याच आशीर्वादाखाली सर्व धंदेवाले पोलिसांना न जुमानता आपले अड्डे चालवत असल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल आणि प्रशासनाचे मौन
परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण पिढीचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या जुगार अड्ड्यांवर आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार तात्काळ कठोर कारवाई करणार का? की हे ‘वसुली बहाद्दर’ कर्मचारी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना मोकळे ऱान देऊन या अवैध धंद्यांना असेच अभय दिले जाणार? या गंभीर प्रश्नाचे उत्तर मिळण्याची प्रतीक्षा आता संपूर्ण परिसरातील सजग नागरिक करत आहे.



