समृद्धी महामार्गावर ७ सप्टेंबरपर्यंत वाहतूक ब्लॉक

नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. महामार्गावर ‘आयटीएमएस’ (ITMS) अंतर्गत सीसीटीव्हीसाठी गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्याअनुषंगाने ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ दरम्यान सिन्नर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
वाहतूक बंद राहण्याची वेळ व दिवस
महामार्ग पोलिसांकडून प्राप्त झालेल्या परवानगीनुसार, ३१ ऑगस्ट, १ आणि २ सप्टेंबर रोजी सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज दरम्यान दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने जाणारी, तर दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील. यानंतर ४, ५ आणि ७ सप्टेंबर रोजी भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान याच वेळेत म्हणजेच दुपारी १२ ते १ (मुंबई दिशा) आणि दुपारी ३ ते ४ (नागपूर दिशा) वाहतूक थांबवली जाईल. विशेष म्हणजे, ६ सप्टेंबर रोजी कोणताही ब्लॉक असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
का घेतला जात आहे ब्लॉक?
समृद्धी महामार्गावर होणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) बसवली जात आहे. यामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही, स्पीड कॅमेरे आणि स्वयंचलित चलन प्रणालीचा समावेश आहे. या यंत्रणेसाठी महामार्गावर लोखंडी ‘गॅन्ट्री’ बसवावी लागते. या कामासाठी क्रेन आणि मोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर करावा लागत असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव हा वाहतूक ब्लॉक घेण्यात येत असून वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



