आरोग्य

एव्हरेस्टची जिरेपूड बाजारातून परत मागवण्याचे आदेश; कीटकनाशकांचे अंश मर्यादेपेक्षा अधिक

नवी दिल्ली : एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्सच्या पाकिटबंद जिरेपुडीच्या एका साठ्यात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकांचे अंश आढळून आल्याने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने संबंधित साठा तातडीने बाजारातून परत मागवण्याचे आदेश दिले आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणीत जिरेपूड सेवनासाठी असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गोव्यातील एका ठिकाणाहून अन्न सुरक्षा विभागाने जिरेपुडीचा नमुना तपासणीसाठी घेतला होता. प्राथमिक तपासणीत ॲझोक्सिस्ट्रोबिन आणि थायमेथॉक्सॅम या दोन कीटकनाशकांचे अंश निर्धारित कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. त्यानंतर अन्न विश्लेषकांनी हा नमुना असुरक्षित घोषित केला.

या निष्कर्षाविरोधात संबंधित अन्न व्यावसायिकाला अपीलची संधी देण्यात आली. त्यानंतर नमुना संदर्भ प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. तेथे झालेल्या तपासणीतही दोन्ही कीटकनाशकांचे अंश निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आणि नमुना असुरक्षित असल्याच्या आधीच्या निष्कर्षाला दुजोरा मिळाला.

त्यानंतर एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्सला संबंधित संपूर्ण साठा तातडीने बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपनीला परत मागवलेल्या उत्पादनाची संपूर्ण नोंद ठेवून त्याबाबतची माहिती आणि कारवाईचा अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई एव्हरेस्टच्या सर्व जिरेपुडीविरोधात नसून तपासणीदरम्यान संबंधित आढळलेल्या साठ्यापुरती आहे. संबंधित जिरेपुडीच्या साठ्याचा तुकडी क्रमांक E080668761 असून, हा साठा बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page