पुण्यात २६४९ ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई

पुणे : शहर वाहतूक विभाग व सर्व पोलीस स्टेशन यांनी मिळून संयुक्तरित्या शहरांमध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली एकूण २६४९ ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान एकूण ९८८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. २१३७ चलन पेड करून घेण्यात आली. त्यामधून २१ लाख ३७ हजार रुपये इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली. याशिवाय एकूण १३,३०८ चलनांवर कारवाई करण्यात आली.
दि. १२ आणि १३ फेब्रुवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान एकूण ५३८० ट्रिपल सीट वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली असून, ट्रिपल सीट व इतर नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून १,०३,२५,१५० रुपये रक्कम शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे.
सदर मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक व वाहतूक दाटीच्या ठिकाणी वाहतूक शाखा व संबंधित पोलीस स्टेशन यांच्यामार्फत एकाच वेळी विशेष कारवाई करण्यात आली. विशेष मोहिमेमध्ये पुणे शहर वाहतूक विभागातील ३० वाहतूक विभाग तसेच ४४ पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
दुचाकी वाहनावर ट्रिपल सीटने प्रवास करणे हे कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. ट्रिपल सीट प्रवासामुळे अपघाताची शक्यता वाढते व स्वतःसह इतर रस्ते वापरकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहनचालना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत, असे जाहीर करण्यात आले.



