नांदेडबीड

अनिल रामोडपेक्षाही पुढचा निघाला! वृक्ष लागवड घोटाळा लपवण्यासाठी थेट ४५ लाखांची लाच घेताना अधिकारी जाळ्यात

बीड/नांदेड : वृक्ष लागवडीतील अनियमिततेची चौकशी थांबवणे, निलंबनाचा प्रस्ताव रद्द करणे आणि थकीत वेतन अदा करण्याच्या मोबदल्यात तब्बल ४५ लाखांची लाच घेताना सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर असतानाच हा लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्याला बीड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वृक्ष लागवडीतील अनियमिततेची चौकशी थांबवणे, निलंबनावर कारवाई न करणे, वृक्ष लागवडीचे बिल मंजूर करणे तसेच कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी लखमावाड याने संबंधितांकडे तब्बल ४५ लाखांची मोठी लाच मागितली होती. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, एसीबीच्या पथकाने कॅनॉल रोडवरील ‘ऊर्जा हाईट’ येथील त्याच्या निवासस्थानी सापळा रचून ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ जेरबंद केले.

या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने बीड येथील घरासह त्याच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी येथील मूळ निवासस्थानीही धडक देत कसून झडती घेतली. या झडतीत १ लाख ७ हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपी अधिकाऱ्याचा दरमहा पगार सुमारे दीड लाख रुपये असताना त्याने एकाच वेळी ४५ लाखांची लाच मागितल्यामुळे त्याने यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर अवैध संपत्ती गोळा केल्याचा संशय एसीबीला आहे. या अनुषंगाने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सर्व बँक खात्यांची, लॉकरची व गुंतवणुकीची तपासणी केली जात असून खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 गुणवान अधिकाऱ्याचा लाचखोरीत सहभाग आणि ‘अनिल रामोड’ प्रकरणाची चर्चा

श्रीनिवास लखमावाड हा बी.टेक. झालेला असून त्याने २०१६ च्या एमपीएससी परीक्षेत राज्य वन सेवेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याचे शालेय शिक्षण नांदेडमध्ये झाले असून त्याचे वडील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, धर्माबाद परिसरातीलच असलेले आणि तीन वर्षांपूर्वी पुण्यात लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांचे प्रकरण या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहे. अनिल रामोड यांच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर म्हणजेच तब्बल ४५ लाखांची लाच मागितल्यामुळे एकाच भागातून आलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कृत्यामुळे धर्माबाद तालुक्याचे नाव पुन्हा एकदा लाचखोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. एक हुशार आणि उज्ज्वल भविष्य असलेला उच्चपदस्थ अधिकारी अशा गंभीर गुन्ह्यात अडकल्याने त्याच्या निकटवर्तीयांना व प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page