नांदेड

सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय; दोषींवर कठोर कारवाई होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना दिले सखोल तपासाचे निर्देश; खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी साधला संवाद

मुंबई विशेष वृत्त : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा परिसरात झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा हल्ला अत्यंत निंदनीय व धक्कादायक असून, या प्रकरणातील दोषींवर कोणतीही कुचराई न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले आहे.

हरसिमरत कौर बादल यांच्याशी साधला संवाद

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी तथा पंजाबच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणादरम्यान त्यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच सुखबीर सिंग बादल लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी सदिच्छा व प्रार्थनाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर आढावा व निर्देश

घटनेचे गांभीर्य ओळखून एकनाथ शिंदे यांनी तात्काळ नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेत पोलिसांना या हल्ल्याचा सखोल तपास करण्याचे कठोर निर्देश दिले. तसेच, सुरक्षेमध्ये काही त्रुटी राहिली आहे का, याचीही सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

 ‘हल्लेखोरांना पाठिशी घातले जाणार नाही’

धार्मिक किंवा सामाजिक ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक घटनांना महाराष्ट्रात किंवा देशात अजिबात स्थान असू शकत नाही, असे ठाम मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. या प्रकरणातील हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. कसून तपासाअंती या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक दोषीचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर बडगा उगारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

धार्मिक स्थळांची पवित्रता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली असून, दोषी व्यक्ती कितीही प्रभागी असली तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page