पुणे शहरलातूर

लेकासाठी मिळवला पेपर, अखेर लेकानेच उघडले ‘मोटेगावकर’चे पितळ; पुण्यात ‘आरसीसी’ सील, तर ईडीकडून आर्थिक कोंडी सुरू!

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन

लातूर / पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर उर्फ ‘एम सर’ यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. आपल्या पोटच्या मुलाला बेकायदेशीर मार्गाने डॉक्टर बनवण्याच्या हव्यासापोटी मोटेगावकरांनी रचलेले पेपरफुटीचे जाळे अखेर त्यांच्याच मुलामुळे उघडे पडले आहे. सीबीआयने (CBI) केलेल्या अटकेनंतर आता सक्तवसुली संचालनालयानेही (ED) मोटेगावकरांच्या आर्थिक साम्राज्याची नाकेबंदी सुरू केली असून, त्यांच्या कोट्यवधींच्या बेनामी मालमत्तेची कुंडली खणून काढण्यास सुरुवात केली आहे.

स्वतःच्याच मुलामुळे विणलेले जाळे ठरले कर्दनकाळ!

तपास यंत्रणांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर यांनी स्वतःच्या मुलाला वैद्यकीय प्रवेश परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून देण्यासाठीच हे संपूर्ण रॅकेट चालवले होते. परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल १० दिवस आधी, म्हणजेच २३ एप्रिल रोजीच मोटेगावकर यांनी रसायनशास्त्र (Chemistry) विषयाची प्रश्नपत्रिका आणि उत्तरे मिळवली होती. हा पेपर त्यांनी आपल्या मुलाला आणि काही मोजक्या विद्यार्थ्यांना ‘गेस पेपर’च्या नावाखाली दिला.

प्रत्यक्ष परीक्षेत या गेस पेपरमधील ४५ पैकी तब्बल ४३ प्रश्न जसेच्या तसे आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशय बळावला होता. सीबीआयने जेव्हा मोटेगावकरांच्या मुलाला संशयित लाभार्थी म्हणून ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली, तेव्हा मुलाच्या जबाबातून आणि डिजिटल पुराव्यांवरून शिवराज मोटेगावकरांचा या गुन्ह्यातील थेट सहभाग उघड झाला. ‘लेकासाठी विणलेले जाळेच अखेर बापाचे पितळ उघडे पाडण्यास कारणीभूत ठरले,’ अशी चर्चा आता शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.

पुण्यात ‘आरसीसी’ सील; पालिका प्रशासनाचा मोठा दणका

सीबीआयच्या अटकेनंतर पुणे महानगरपालिकेनेही (PMC) मोटेगावकरांना मोठा झटका दिला आहे. पुण्याच्या डेक्कन (एफसी रोड) परिसरातील ‘आरसीसी’ क्लासेसच्या इमारतीला पालिकेने टाळे ठोकले आहे. सदर इमारतीमध्ये कोणतीही परवानगी न घेता अंतर्गत बदल करणे, निवासी जागेचा व्यावसायिक वापर करणे आणि ‘भोगवटा प्रमाणपत्र’ (Occupancy Certificate) नसणे या कारणांमुळे पालिकेने ही थेट कारवाई केली आहे.

मालमत्ता जप्तीची तयारी; ‘ईडी’ करणार आर्थिक कोंडी

लातूरमध्ये एकेकाळी सायकलवर फिरणारे मोटेगावकर गेल्या १५ वर्षांत शेकडो कोटींचे मालक कसे झाले, याचा तपास आता ‘ईडी’ करत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ईडीने मोटेगावकरांच्या सर्व स्थावर मालमत्तांची माहिती मागवली आहे.

पुण्यातील ४० कोटींची जमीन:  पुण्याच्या वारजे परिसरात मोटेगावकरांनी खरेदी केलेल्या ५१ गुंठे जमिनीचा व्यवहार (ज्याची किंमत जवळपास ३५ ते ४० कोटी रुपये आहे) ईडीच्या रडारवर आहे.

लातूरमधील अनधिकृत साम्राज्य: लातूरमधील त्यांची ३ एकरांमधील मालमत्ता आणि उद्योग भवन परिसरातील साडेसहा कोटींचे ८ भूखंड अनधिकृत असल्याचे समोर आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

ईडीने अद्याप मालमत्ता अधिकृतपणे जप्त केली नसली, तरी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत (PMLA) लवकरच त्यांच्या बँक खात्यांवर आणि बेनामी मालमत्तांवर जप्तीची टाच आणली जाणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या शिक्षण माफियाची पाळेमुळे मुळासकट उपटून टाकण्यासाठी सीबीआय आणि ईडीने आता संयुक्त मोहीम तीव्र केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page