‘विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा’ मोहीम वेगाने पुढे जात आहे – मोदी!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १३७व्या भागातून देशातील तरुण, महिला सक्षमीकरण, इतिहासाचे ज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील विद्यार्थिनींच्या सहभागावर सविस्तर भाष्य केले. ‘मन की बात’ हे नवीन उपक्रम आणि कल्पना देशासमोर आणण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. “देशात तरुण निर्मात्यांची कमतरता नाही,” असे म्हणत त्यांनी तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे भरभरून कौतुक केले.
इतिहास अधिक सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी तरुणांना bharatrajya.com या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले. या वेबसाइटवर कोणतेही वर्ष निवडल्यानंतर त्या काळात भारताच्या कोणत्या भागावर कोणाचे राज्य होते, याची सविस्तर माहिती मिळू शकते. मुंबईचे कृष्णा शेषाद्री यांनी ही वेबसाइट तयार केली असून, त्यांचा हा उपक्रम इतिहास अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मोदी म्हणाले.
व्यसनमुक्त भारतासाठी सामूहिक प्रयत्नांची हाक
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. ‘विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा’ ही मोहीम वेगाने पुढे जात असून मोठ्या संख्येने तरुण यात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांचे व्यसन व्यक्तीसोबतच कुटुंब आणि समाजासाठी घातक ठरत असल्याने तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
महिला सक्षमीकरण आणि ‘पीएम स्वनिधी योजना’
पंतप्रधानांनी ‘पीएम स्वनिधी योजने’चा उल्लेख करताना महिला सक्षमीकरणातील तिच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी अंदाजे ४६ टक्के महिला असून, देशातील सुमारे ३५ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आपला व्यवसाय वाढवत आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा आधार महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मिशन शक्तीसॅट’ आणि अंतराळ क्षेत्रातील विद्यार्थिनींचा सहभाग
अंतराळ क्षेत्रातील विद्यार्थिनींच्या सहभागाबाबत बोलताना मोदी यांनी ‘मिशन शक्तीसॅट’चा उल्लेख केला. या मोहिमेद्वारे १०८ देशांतील १२,००० विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळत आहे. २३ ऑगस्ट रोजी साजऱ्या झालेल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे या मोहिमेचे सुंदर छायाचित्र पाहायला मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.



