गुन्हेगारीपुणे शहरमहाराष्ट्रराजकारणशैक्षणिकसामाजिक

वाघोलीत खुलेआम होलसेल गुटखा विक्री; मंत्र्यांच्या आदेशाला ‘एफडीए’ची केराची टोपली 

पुणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग मंत्री संजय राठोड यांच्या आदेशाला पोलीस आणि स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाने केराची टोपली दाखवली आहे की काय अशी शंका येते. पुण्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे वाघोलीमध्ये होलसेल गुटखा विक्री तेजीत असून त्यामुळे गुटखा खाऊन सार्वजनिक रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे प्रमाण संपूर्ण शहरात वाढले आहे.

महाराष्ट्रात गुटखा विक्री,साठवण यावर बंदी आहे. तरीही गुटखा खाणाऱ्यांसाठी दिल्ली, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून छुपेपणे गुटखा आणून विकला जातो. शहरात कोंढवा हे छुपेपणे गुटखा होलसेल विक्रीचे मुख्य ठिकाण असून वाघोली जवळ लोणीकंद, लोणी काळभोर अशा ठिकाणापर्यंत होलसेल विक्रेत्यांचे जाळे पसरले आहे.पानपट्ट्यांमध्ये हा गुटखा विकणारे दलाल येथील विक्रेत्यांकडून गुटखा घेऊन पोचवतात व नफेखोर पानपट्टी चालक चढ्या भावाने गुटखा विकतात असे दुष्टचक्र आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना महाराष्ट्रात मुंबई,पुणे, नागपूर नाशिक अशा शहरांसह अनेक भागांमध्ये गुटखा विक्री सुरू आहे अशी माहिती समजल्यानंतर त्यांनी छुपेपणे विक्री सुरू असलेल्या ठिकाणी कडक कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन व पोलिसांना दिले. तथापि पुण्यात या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या विभागाने छापा टाकून कोठे कारवाई केल्याचे उदाहरण सुध्दा दिसून येत नाही.

कॅम्पात २ लाख ३२ हजारांच्या ई-सिगारेट जप्त

दरम्यान, गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाने एम.जी.रोड परीसरात तंबाखूजन्य ई-सिगारेट (वेप) विक्री करणाऱ्या ३ दुकानांवर कारवाई करून २ लाख ३२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार लष्कर पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असताना तंबाखुजन्य ई सिगारेटची विक्रीची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने लष्कर कॅम्प परीसरात ३ दुकानानवर छापा टाकला गेला .बेकायदेशीरपणे ई- सिगारेट (वेप) विक्री करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेवून वेग – वेगळया कंपनीच्या (वेप) ई सिगारेट इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ३ दुकानदारांचे विरूध्द जाहिरातीस प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनीयमन अधिनीयम २००३ व नियम २००४ चे कलम ७ (२), २० (२) तसेच इलेक्ट्रोनिक सिगारेट प्रतिबंध सुधारणा कायदा कलम २०१९ चे कलम ५ सह ८ अन्वये कारवाई करण्यात आली. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाई कामी लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली झाली.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे व राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार, बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, रेश्मा कंक, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार या पथकाने कारवाईत भाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page