आनंदात मश्गूल होत रस्ता अडवणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांची समज
फौजदार पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गुलाल उधळून मिरवणूक

पुणे : पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या परीक्षेचा निकाल आज सुमारे ३ वर्षांनी जाहीर झाला. महाराष्ट्रातून एक हजार विद्यार्थी या एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याची माहिती समजली. पुणे शहरामधील एमपीएससीची तयारी करणाऱ्या २५ जणांचा त्यात समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सदाशिव पेठेत आपापल्या स्टडी सर्कल जवळ त्यांच्या मित्र मंडळींनी गुलाल उधळून, फटाक्यांच्या सरी फोडून, खांद्यावर घेऊन मिरवणुका काढल्या. यशस्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. शिवाजी मंदिरासमोरील रस्त्यावर या विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अखेर गस्तीवरच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांना समज दिली.

यूपीएससी एमपीएससी परीक्षा साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आहे. आपापल्या गावापासून दूर राहून विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जीवाचे रान करत असतात.
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांची लगबग नेहमी सदाशिव पेठेत नवी पेठ, खुन्या मुरलीधर, टिळक रोडवरील चिमणबाग भागामध्ये असते. त्यांच्यासाठी स्वस्त खानावळी आणि राहण्याच्या सुविधा तसेच क्लासेस या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.
या मुलांचा दिवसभर वावर सदाशिव पेठेत विविध ठिकाणी असतो. अशाच दोन,तीन धाडसी विद्यार्थ्यांमुळे पोलीस चौकीजवळ एका महाविद्यालय युवतीवर हल्ला करणाऱ्याला पकडून पोलीस चौकीमध्ये नेण्यात आले होते.त्यामुळे त्या मुलीचा प्राण वाचला. ही घटना महाराष्ट्रात चर्चेत होती.
दरम्यान,आज पुणे शहरात एमपीएससीची तयारी करणाऱ्यांपैकी सुमारे २५ जणांची पोलीस उपनिरीक्षक अर्थात फौजदार म्हणून निवड झाली. सरकारी नोकरीत निवड होणे ही सध्या अतिशय कठीण बाब झाली असताना या विद्यार्थ्यांनी ती झेप घेतली आहे. या आनंदात मश्गूल असलेल्या विद्यार्थ्यांना भान राहिले नव्हते. मात्र दोन महिला पोलीस आणि गस्तीवरच्या वाहनातून दोन कर्मचारी घटनास्थळी आले. ‘फौजदार झाला आहात तर नियम पाळा’ असे आवाहन केले. नंतर गर्दी पांगली.



