अतिरेक्यांना जेरबंद करणाऱ्या, गस्तीवरच्या पोलिसांचा आयुक्तांकडून सत्कार

पुणे : गस्तीवरच्या दोन पोलिसांनी दुचाकी चोरीची खटपट करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांचा तिसरा साथीदार पळून गेला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळविल्यानंतर केलेल्या झाडाझडतीत संशयित चोरटे म्हणजे अतिरेकी असल्याचे दिसून आले. जयपूर बाॅम्ब स्फोट खटल्यात ते आरोपी होते. पुण्यात लपून राहत होते.
मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४) मोहम्मद इम्रान मोहम्मद यसूफ खान(वय २३ दोघेही मूळ रतलाम, मध्य प्रदेश ) अशी अटक आरोपींची नावे असून मोहम्मद शाहनवाज आलम (वय ३१) हा फरार झाला आहे. तो मूळचा झारखंड येथील आहे. तिघेही ‘सुफा’ संघटनेशी संबंधित आहेत.

१८ जुलै रोजी शास्त्रीनगर बीट मार्शलवरील पोलीस अंमलदार, प्रदिप चव्हाण व अमोल नजन शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्र गस्त घालत होते. रात्री अडीचच्या सुमारास त्यांनी तीन वाहनचोर संशयितांना पाहिले. पोलिसांना पाहून चोरट्यांपैकी एक पळाला.
बीट मार्शल्सनी रात्रपाळीचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक प्रविण कुलकर्णी यांना माहिती कळविली. त्यानंतर अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाल, वैभव शितकाल यांची टिम तयार करून, संशयितांना घरझडतीसाठी नेण्यात आले. घरझडती मध्ये एक जिवंत काडतूस, चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर कागदपत्रे मिळून आली.
त्यामध्ये आरोपी देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आल्याने अधिक तपास करता ते राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे (NIA) फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध कोथरूड पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि.सं. कलम ४६८,३७९, ५९१,३४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५). ४ (२५) महाराष्ट्र पोलिस अॅक्ट क. ३७ (१)३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ सुहेल शर्मा यांनी वरील कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे बोलावून त्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला. तसेच यापुढे देखील त्यांनी अशीच उत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.



