कोळसा घोटाळा प्रकरण भोवले; विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र यांना ४ वर्षांची शिक्षा

दिल्ली : कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने काँग्रेसचे वैदर्भीय नेते, राज्यसभा माजी खासदार विजय दर्डा यांना आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे . छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी दर्डा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या पाच दशकांपासून दर्डा कुटुंब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहे. विजय दर्डा ‘लोकमत’ समूहाचे अध्यक्ष आहेत.
न्यायालयाने आज विजय दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम १२० बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.
या प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक के.एस. क्रोफा आणि के.सी. सामरिया यांना ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.



