संपादकीय अग्रलेख

“महाराष्ट्र मिशन” विशेष लेख – पशुत्वावरचा किरीट

माणूस हा सामाजिक प्राणी. तो अजूनही प्राणी अवस्थेतून संपूर्ण बाहेर पडू शकलेला नाही. माणसापासून डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना सारख्या असंख्य विषाणूंपर्यंत साऱ्या सजीवांची निर्मिती निसर्गाची. या निर्मिकापेक्षा माणूस मोठा होऊ शकत नाही. माणसातल्या पाशवीपणाची उदाहरणं सतत आजकाल पुणे, मुंबई पासून जगभरातल्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या घटनांतून प्रत्ययाला येतात ती पाशवीपण उफाळल्यानं.

अमेरिकेत टेक्सासमधल्या शाळेत अंदाधुद गोळीबार करुन १८ निष्पाप बालकांसह ३ शिक्षकांचा जीव घेणारा माथेफिरु असो, दिल्लीत एकतर्फी प्रेमातून प्रेयसीवर चाकुनं हल्ला करत ३० /३५ वेळा भोसकून तिची चाळणी करणारा कोणी असो, की पुण्यात पेरुगेटाजवळ महाविद्यालयीन युवतीवर कोयत्यानं हल्ला करणारा तरुण असो. विशिष्ट परिस्थितीत पाशवी बनलेली ही माणसं मनुष्यत्वाकडून पशूत्वाकडं सुरू असलेलल्या उलट्या प्रवासावर किरीट म्हणजे मुकुट चढवणारी.

केवळ या आणि अशा क्रूर हिंसक घटनांमधून माणसातल्या पशुत्वाचं दर्शन होतं असं नाही. लैंगिक अनुभवांपासून करोडो योजने दूर असलेल्या एखाद्या निष्पाप बालिकेवर कोणी वासनांध बलात्कार करतो, तेव्हाही माणसातलं पशुत्व पुढं येतं. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या ‘हनीट्रॅप’ च्या जाळ्यात अलगद फसणारा ‘डीआरडीओ’ चा शास्त्रज्ञ संचालक याच वासनांधाचं सौम्य रुप.

‘ईडी’ सारख्या बेहिशेबी अमाप पैशांच्या झेंगटांमध्ये बिनीच्या राजकारण्यांना अडकवून त्यांचं वस्त्रहरण करणारा किरीट सोमय्यांसारखा बुध्दीमान नेता सुद्धा स्वतःच निर्वस्त्र अवस्थेत जे काही करतो ते सुद्धा माणसातल्या आदिम पशुभावना उतार वयातही प्रखर असतात हे दाखवून देणारं. अर्थात हे उदाहरण आज सोशल मीडियाच्या झंझावातामुळं सार्वत्रिक झालं. यापूर्वीच्या काही दशकांमध्ये अंधारात दडून राहिलेली, दबक्या आवाजात चर्चा होणारी लफडी, जांगडगुत्ते नव्हते असं नाही. अर्थात, आपल्या अवयवाशी कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. दिल्लीत जाऊन हा माणूस अतिशय थंड मनानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटला. त्यांच्या चेहऱ्यावर अवमान, लज्जा, बदनामी अशा कसल्याही छटा नव्हत्या.

या नेत्यानं जे काही मोबाईल कॅमेऱ्यासमोर केलं, ते इन कॅमेरा, बंद खोलीत करणारे कितीतरी. असतील. त्या आणि तद्वत क्रियांचं उत्तान प्रदर्शन करणारी अक्षरशः लक्षावधी पोर्नोग्राफिक साहित्य इंटरनेटवरकळ दाबताच दिसत राहतात. बव्हंशा दुहेरी नितीमत्ता असलेल्या या समाजातल्या काही राजकीय घटकांनी या घटनेचं भांडवल केलं. काही जण हसले,काही गप्प बसले,तर काही जण आपलीच तशी क्रुत्यं आठवून थिजले.

सोमय्या यांनी आपण कोणत्याही महिलेवर अन्याय केलेला नाही, असं सांगून स्वतः च याविषयी पोलीस चौकशी करण्याची मागणी केलीय. या नेत्याला म्हणे तरुण मुलांशी ‘तसल्या’ गोष्टी करायची सवय. त्यामुळंच ते कोणत्याही महिलेवर आपण अन्याय केला नाही,असं छातीठोकपणे सांगतात. या असल्या खासगीत सर्रास आणि सार्वजनिकपणात लाजिरवाण्या असलेल्या क्रियेची चित्रफित कोणी कशी सार्वत्रिक केली हाही आता उत्सुकतेचा विषय.‌ कदाचित त्या वेळी व्हिडिओ काॅलवर असणाऱ्यानंही व्हिडिओ व्हायरल केला असेल. काय खरं ते पोलीस चौकशीत पुढं येईल,एक नक्की आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे लफडं बाहेर पडलं असतं तर त्यांची काही धडगत नव्हती. संस्कृतीचा ढोल पिटणाऱ्या भाजपच्या नेत्याचा लाजिरवाणा प्रकार पुढं आल्यावर या पक्षात अस्वस्थता पसरलीय.

एकमात्र खरं, या अश्लील व्हिडिओ बाॅम्बमुळं ज्या राष्ट्रवादी संशयित भ्रष्ट नेत्यांवर ‘ईडी’नं धाडी टाकल्या, त्या ‘सत्तापावन’ झालेल्या नेत्यांविषयीची उलटसुलट चर्चाच बंद झाली. ती बंद होणं कुणाला अपेक्षित होतं? दुहेरी युतीमध्ये त्रिस्तरीय बदल होऊन सत्ताबदल झाल्यानंतर हा मुलुंड निवासी नेता नकोसा झाला असावा का? ‘ईडी’च्या ढिगभर फाईली या नेत्यानं आता समुद्रात बुडवाव्यात अशा मीम्स सोशल मीडियावर झळकत असतानाच त्याला सार्वजनिक जीवनातून उठवणारी, बदनाम करणारी चित्रफीत नेमकी कशी ‘व्हायरल ‘ होते? ती अलिकडची आहे की जुनी? असे अनेक प्रश्न.

आपलं झाकून ठेवून दुसऱ्याचं वाकून पाहण्याचा मानवी स्वभाव अशा वेळी विशेषकरून उफाळून आला तर नवल नाही. राजकारणी असला, कितीही बुद्धिवंत असला तरी तो मुळचा पशूच. निसर्गानं माणसाला बुध्दीमत्तेची देणगी दिली. त्यामुळं माणूस चंद्रावर, मंगळावर पोहचला. पण याच बुध्दीमान माणसाला निसर्गानं लैंगिकतेच्या बाबतीत पशुपातळीपासून वर उठू दिलेलं नाही. पूर्वी मनुष्य प्राण्याला असलेली शेपटी गळून पडली, तो जास्त माणूस झाला. उत्क्रांती अवस्थेत त्यानं नैतिकतेचे ,मूल्यांचे नवनवे आयाम निर्माण केले. मात्र काळाच्या ओघात ही मूल्यं सुध्दा गळून पडली. अन्यथा कोरोनाचा प्रभाव नुकताच कुठं उतरत असताना रशियानं युक्रेनवर हल्ला करुन युद्ध छेडलं नसतं. येन केन प्रकारे सत्ता काबीज करण्यासाठी काही पक्षांनी मतदारा़ंशी प्रतारणा करत विरोधी पक्षाशी संधान साधलं नसतं. महाविकास आघाडीही तयार झाली नसती किंवा अलिकडचीच राष्ट्रवादी महायुतीही निर्माण झाली नसती.

राजकारण असो की आंतरराष्ट्रीय संबंध असोत, वैयक्तिक, कौटुंबिक संबंध असो अगर जाती,धर्मातील वाद असोत किंवा जगभरच उफाळलेला हिंसाचार असो, मानवी मूल्यं गळून पडली आहेत हे ठसठशीतपणं दिसून येतंय.

ताज्या अनैतिकतेविषयीच्या या साऱ्या चर्चांचं फलित काय? तर यापुढं ‘ईडी’ची भिती काही घटकांना वाटणार नाही. बाकी साऱ्या पंचवीस ते पन्नास वयोगटातल्या लोकांना, त्यांच्या समाजाला भावनिकतेचं,मूल्यांचं काही देणं घेणं नाही. ही मंडळी वास्तवात जगतात. त्यांना आधुनिकतेचं, संपन्न आणि वेगवान सुरक्षित जीवनाचं आकर्षण आहे. राजकीय बरबटलेपणात आणखी भर टाकणाऱ्या अशा विषयांवर चर्चा काही दिवस होत राहतील आणि विसरुन जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page