महाराष्ट्रातून मोसमी पाऊस माघारीच्या वाटेवर; मराठवाडा-विदर्भातही उघडीप वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला वेग आला असून पुढील दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भागांसह छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकातील आणखी काही भागांतून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील काही भागांतून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. परतीची रेषा ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हर्णेपर्यंत पोहोचली असून पुण्यासह राज्याच्या मोठ्या भागात पावसाची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत कोरडे हवामान आणि ऑक्टोबरच्या उकाड्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
कोकण आणि गोव्यात पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मोसमी पावसाची माघार सुरू झाली असली तरी राज्यात सर्वत्र लगेच पूर्णपणे कोरडे हवामान राहणार नाही.
केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकातही काही भागांत पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या कोणताही इशारा देण्यात आलेला नाही; मात्र ६ ऑक्टोबर ते पुढील काही दिवसांत विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी हवामानाची शक्यता वर्तवली आहे.



