गुन्हेगारीपुणे शहरमहाराष्ट्रराजकारणसामाजिक

पुणे ड्रग्स प्रकरणी लिक्विड लिजर हॉटेल सिल, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन

पुणे : पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. पोलीस आयुक्तांच्या सूचना आणि उत्पादन शुल्क विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून एफसी रोडवरील एल थ्री – लिक्विड लिजर लाउंज हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे ५ वाजेपर्यंत पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. काही निवडक तरुणांसाठी या पार्टीचं आयोजन केलं होतं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे प्रशासन खडबडून जागं झालं आहे.

पुणे पोलीस आणि अबकारी कर विभागाकडून एफसी रोडवरील एल थ्री – लिक्विड लिजर लाउंज हा पब सील करण्यात आला आहे. ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ बारमालकांसह १ मॅनेजर १ डीजे १ पार्टी आयोजक आणि २ पार्किंग कर्मचारी यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामात हलगर्जीपणा केल्याने पुणे पोलीस दलातील दोन बिट मार्शलचे निलंबन करण्यात आले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पब्स आणि रुफटॉप्स मालकांना इशारा दिला होता. परंतु ड्रग्स सारख्या गंभीर विषयाकडे देखील पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप

संबंधित प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पुणे शहर आणि आसपासच्या भागात पहाटे तीन वाजेपर्यंत पब हे चालविले जात आहेत. या विरोधात पोलिस आयुक्त कार्यालयासमोर पब चालकांची यादी वाचून दाखविली होती. आता पुन्हा ती वेळ आणू नका, पोलिसांनी पब चालकांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. तसेच विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे केवळ कारवाई करु असे आश्वासन देतात. मात्र ते काही करत नसून ते कसाई सारखे वागतात, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा – अंधारे

तसेच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, मागील वेळेला जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे आढळायला लागले, तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई आरेरावीने बोलतात. त्यांना मला खास प्रश्न विचारायचाय, हप्ता भरपूर मिळाला की आम्ही तरुणांच्या जीवनशी सुद्धा त्यांना खेळायचे. या सगळ्या प्रकरणांमध्ये शंभूराजे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय शंभूराजे देसाई यांच्यासाठी फक्त काम करणारे राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे. याशिवाय पुणे सुधारू शकत नाही. महाराष्ट्रातील ड्रग्जचा विळखा त्याशिवाय नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे माझी मागणी आहे की शंभूराजेंनी राजीनामा द्यावा आणि एक्साइस अधिकारी राजपूत यांचं निलंबन व्हावं, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पुण्याची बदनामी सहन केली जाणार नाही – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची बदनामी सहन केली जाणार नाही असं कडक शब्दात म्हटलं आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत म्हटलं की, काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडीओ वृत्तवाहिन्यांमधून पुढे आले असून हा प्रकार अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय संबंधित हॉटेलचे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, पुणे ड्रग्स प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. कुणी निष्काळजीपणा केला असल्यास करावाई करू. राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. दोषी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई होईल.

पबविरोधात दोनदा तक्रार ?

धक्कादायक बाब म्हणजे दोन पालकांनी पबच्या विरोधामध्ये पोलीस आयुक्तांकडे रितसर तक्रार नोंदवली होती, अशी देखील माहिती समोर येत आहे. आमची मुलं या पबमध्ये जाऊन नको त्या गोष्टी करत आहेत, अशी तक्रार त्यांची होती. परंतु पबच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पालक आणि इतर तक्रारदारांना पब मालक संतोष कामटेने धमक्या दिल्याचं समोर येत आहे.

५ जण पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मालक संतोष कामटेसह एक मॅनेजर आणि एक कर्मचारी यांचा समावेश आहे. हॉटेलच्या 3 भागिदारांनाही ताब्यात घेतलं आहे. संतोष कामठे, रवी माहेश्र्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page