
पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी मा. आयुक्तांना निवेदन सादर करून काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अयोग्य वर्तन, दबाव तंत्र तसेच सोशल मीडियाच्या गैरवापराविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार वैयक्तिक तक्रारी फक्त संबंधित व्यक्तीकडूनच स्वीकाराव्यात व तृतीय पक्षाकडून येणाऱ्या तक्रारी ग्राह्य धरू नयेत, अशी स्पष्ट तरतूद असतानाही काही जणांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच सोशल मीडियावर अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वाढले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
यावर आयुक्तांनी संबंधित खोडसाळ व्यक्तींविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्याचे, पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई घेण्यासाठी सूचना देण्याचे तसेच अशा व्यक्तींना महानगरपालिका कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
अधिकाऱ्यांनी अशा प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच प्रशासनाच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली आहे.
चौकट 👇 👇 👇 👇 👇 👇
प्रामाणिकपणे काम केले….
दरम्यान, महापालिकेतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांची कामे वेळेत आणि प्रामाणिकपणे पार पाडली तर दबाव तंत्राचा व सोशल मीडियाचा वापर कोण , कशासाठी करेल, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.



