ठाणेमहाराष्ट्र

अनधिकृत होर्डिंगवरून उच्च न्यायालयाचे ठाणे पालिका प्रशासनाला शपथपत्र सादर करण्याचे आदेश

ठाणे प्रतिनिधी : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने बेकायदा होर्डिंगवर कारवाई केली होती. मात्र ठाणे महापालिकेने किती फलकांवर काय कारवाई केली याबाबत संदिग्धता होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओवळा-माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी माहिती घेतली व त्यात धक्कादायक माहिती उघडकीस आली.

ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही गेली अनेक वर्षे महापालिकेची फसवणूक करणार्‍या होर्डिंग व्यवसायिकांसह, चुकीचा स्थळ पाहणी अहवाल देणार्‍या जाहिरात विभागातील अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून वकील सागर जोशी यांच्यामार्फत संदीप पाचंगे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी (दि.20) झालेल्या सुनावणीत महापालिकेची बाजू मांडणारे वकील मंदार लिमये यांना कोर्टाने खडेबोल सुनावले.

महापालिकेने ११ कोटी रुपयांचा दंड ४९जाहिरात फलक कंपन्यांना ठोठावला होता तसेच वसूल करायला ७ दिवसांची वेळ दिली होती, मात्र महापालिका राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. अनधिकृत ४९ होर्डिंगवर काय कारवाई केली, याची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, फलकांचा वाढीव आकार कमी करण्याचे आदेश देण्याशिवाय महापालिकेने काहीच कारवाई केलेली नाही. काही जाहिरात कंपन्यांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन करून भले मोठे फलक लावण्यात आले आहेत.

महापालिका अकार्यक्षम आहे किंवा होर्डींग व्यवसायात भागीदार आहे असे कडक ताशेरे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ओढले. कोर्टाने आता संपूर्ण ठाणे शहरातील जाहिरात फलकांबाबत काय कारवाई करणार आहात, याचे शपथपत्र पुढील तारखे आधी देण्यास सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page