जैन साधुंच्या पदयात्रेत भरधाव रिक्षाने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू
१४ वर्षांपूर्वी मीतच्या वडिलांचे निधन झाले असून एकुलता एक मीतच्या मृत्यूने त्याच्या आईचा आधार हरपला आहे.

रायगड प्रतिनिधी : पायी यात्रा करणार्या जैन साधूंसोबत चालत असलेल्या मीत विनोद जैन (वय १८ रा.शिळफाटा खोपोली) या युवकाला भरधाव रिक्षाने धडक दिल्याने त्याचा जागेत मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत घडली.
पायी यात्रा करणार्या साधूंसोबत सेवेसाठी मीत आणि त्याचा मित्र खोपोलीहून चौक गाव येथे आले होते. मीतचा मित्र कलोते येथे थांबला होता तर मीत चौक येथे आला होता. चौक ते खोपोली पदयात्रा करत असताना चौक हद्दीत आसरे गावानजीक खोपोलीच्या दिशेने जाणारी अनियंत्रित झालेली रिक्षाची धडक मीतला बसली. ही धडक एवढी प्रचंड होती गंभीर जखमी मीतचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. रिक्षाचालक महेंद्र शंकर निकम (रा. कांदिवली मुंबई) हा देखील अपघातात जखमी झाला आहे. मीतच्या मृत्यूची बातमी खोपोली समजतात खोपोलीतून मोठ्या संख्येने नागरिकांनी चौक येथील रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी मीतचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रिक्षाचालक महेंद्र निकम विरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मीतच्या मृत्यूने खोपोलीत हळहळ व्यक्त होत आहे. मिथा त्याच्या आईचा आधार होता. १४ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून एकुलता एक मीतच्या मृत्यूने त्याच्या आईचा आधार हरपला आहे.



