अजित डोवाल यांना पुण्यात प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या शानदार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते डोवाल यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अजित डोवाल यांचा गौरव करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले की, मी गुजरातचा गृहमंत्री असताना अजित डोवाल यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे १३ बॉम्बस्फोट प्रकरणांचा यशस्वी उलगडा झाला होता. तसेच, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून, सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असेही शहा यांनी नमूद केले.
या राष्ट्रीय पातळीवरील सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुरस्काराचे मानकरी तथा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक आणि आमदार डॉ. प्रणिती टिळक आदी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील ‘चाणक्य’ संबोधले. अमित शहांच्या उपस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, “एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर पुण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील चाणक्य असलेल्या डोवाल यांना सन्मानित करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील चाणक्य असलेले अमित शहा उपस्थित राहणे हा एक उत्तम योग आहे.” २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर देशाच्या सुरक्षेचे धोरण पूर्णपणे बदलल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
७६ वर्षांनंतर पुण्यात परतल्याची भावना
सत्काराला उत्तर देताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुण्यात येऊन हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना प्रचंड आनंद व्यक्त केला. आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, “माझे वडील सैन्यात होते. मी लहान असताना आम्ही जवळपास दीड वर्षे पुण्यात राहिलो होतो. माझी आई मला दर मंगळवारी न चुकता चतुःशृंगी देवीच्या मंदिरात घेऊन जायची. त्यानंतर वडिलांची बदली झाल्यामुळे पुन्हा पुण्यात येण्याचा योग आला नाही; परंतु बरोबर ७६ वर्षांनंतर आज थेट लोकमान्य टिळकांच्या नावाचा मानाचा पुरस्कार घेण्यासाठी पुण्यात येण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे.”



