नागपुर

जेन-झी’ला आता काहीही बोलणे झालेय मुश्किल; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे मिश्कील पण सूचक वक्तव्य!

नागपूर : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेले आंदोलनाचे वातावरण आणि त्या पार्श्वभूमीवर तरुण पिढीबाबत (Gen-Z) सुरू असलेल्या चर्चांच्या केंद्रस्थानी आता खुद्द पोलीस यंत्रणाही आली आहे. दरम्यान, नागपूर येथील भोसला मिलिटरी स्कूलतर्फे ‘कारगिल विजय दिनानिमित्त’ डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात पोलिसाधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी तरूण पिढी आणि पोलिसांच्या कामाच्या स्वरूपावर अत्यंत मार्मिक भाष्य केले.

मान्यवरांची उपस्थिती आणि कार्यक्रमाचे स्वरूप

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नागपूर विभागाचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, सचिव राहुल दीक्षित, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल अमरेंद्र हरदास, मुख्याध्यापक अजय शिर्के आणि जे. एस. रिआर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘जेन-झी’ आणि तरुणांच्या मानसिकतेवर आयुक्तांचे भाष्य

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नांगरे पाटील यांनी सध्याच्या तरुण पिढीच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. “सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला असून सेकंदागणिक मन स्क्रोल होत आहे, ज्यामुळे मनाचा ‘केमिकल लोचा’ होत आहे,” असे ते मिश्कीलपणे म्हणाले. तसेच, आजच्या ‘जेन-झी’ (Gen-Z) पिढीबाबत बोलताना ते म्हणाले की, “ही पिढी भारताचे भविष्य आहे, पण सध्या त्यांना कुणी काहीच बोलू शकत नाही, त्यांच्याशी संवाद साधणे किंवा त्यांना समजवणे देखील आता मुश्किल झाले आहे.”

पोलीस दल म्हणजे थँकलेस जॉब

यावेळी त्यांनी पोलिसांच्या कर्तव्यावर आणि त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांवरही मनमोकळा संवाद साधला. “पोलिसांची ड्युटी असो वा सीमेवरील जवानांची, हे सर्वजण ‘थँकलेस जॉब’ करतात. कितीही चांगले काम केले तरी शेवटी पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात. विशेषतः मागील आठ दिवसांपासून तर मी काही अधिकच शिव्या खातोय,” असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक गुणांक (EQ & IQ) वाढवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page