गुन्हेगारीपुणे शहरसामाजिक

पतीसह चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल, विवाहितेच्या फिर्यादीवरून वाघोली पोलिसांची भा.न्या.संहितेनुसार कारवाई 

पुणे : भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ ची जागा आता भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ ने घेतली आहे. विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या प्रकरणात पती, सासू, सासरा, नणंद अशा ४ जणांवर या कलमासह गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे, मारहाण, अपमानास्पद वागवणे, चिथावणी देणे या भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वाघोली पोलीस ठाण्याकडून ही कारवाई करण्यात आली.

कलम ८५ विवाहित महिलेवर तिच्या पती किंवा सासरच्या लोकांकडून होणाऱ्या क्रूरतेच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. हे कलम महिलांना हुंड्यासाठी होणाऱ्या छळापासून आणि मानसिक किंवा शारीरिक छळापासून संरक्षण देते. ते आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या क्रूरतेशी किंवा गंभीर हानी पोहोचवण्याशी संबंधित आहे.

अतुल दादासाहेब वाळके, दादासाहेब साहेबराव वाळके, शामल दादासाहेब वाळके, (सर्व राहणार मौजे पेरणे, वाळके वस्ती ता. हवेली) नणंद जयश्री दिंगबर घुले (रा. घुले वस्ती मांजरी ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत.

सोनल अतुल वाळके (वय ३७ वर्षे, रा. आदित्य सिटी खैरे अपार्टमेंट, स्टार लॉजिंगच्या मागे, पेरणे फाटा ता. हवेली. सध्या रा. वाघोली) यांनी याबाबत फिर्याद केली आहे.

माहेर वरुन व्यवसाय करण्यासाठी व चारचाकी गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन यावे यासाठी आपला छळ करण्यात आला. चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

१२ वर्षांपूर्वी महिलेचा विवाह झाला. मुलगी ओवी (वय ११ ) व मुलगा नामे श्लोक यांच्यासह पीडिता एप्रिल महिन्यापासून भाड्याने राहण्यास आहे. उदरनिर्वाह माहेर कडून केला जातो.

घर खर्चासाठी वृद्ध वडिलांकडून पैसे मिळतात. घराचे भाडे व मुलांकरीता खर्च पती करतो. तो त्याच्या आई वडिलांसोबत राहतो.

मुलगी झाली तेव्हा पासून सासरकडून काही ना काही कारणावरुन वाद होऊन त्रास करण्यास सुरु झाला. झाल्या प्रकाराबाबत माहेरी आई, भाऊ, वहिनी यांना सांगितले तेव्हापासून अधिकच छळ सुरू झाला, असे फिर्यादीत म्हटले असून अधिक तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page