खाकीचा धाक धाब्यावर बसवून चोरटी दारू विकणारा लिंबराज पिंजरे पुन्हा औराद पोलिसांच्या कचाट्यात!
३ केसेसनंतरही पैशाच्या चटकेपोटी अवैध धंदा करणाऱ्या लिंबराजवर आता 'कलम ९३' चा कडक बडगा

औराद शहाजानी (निलंगा) : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे हलगरा येथे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर औराद शहाजानी पोलिसांनी पुन्हा एकदा छापा टाकून त्याला रंगेहात पकडले आहे. लिंबराज गोविंद पिंजरे (वय ३२, रा. हलगरा) असे या सराईत दारू विक्रेत्याचे नाव असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या या सततच्या अवैध धंद्यांमुळे गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून शांतता भंग होत असल्याने, पोलिसांनी आता त्याच्यावर कडक कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
खानावळीच्या आडोशाला चोरटी विक्री
सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी सकाळी १०:४० वाजण्याच्या सुमारास, हलगरा येथील हनुमान खांडसरी साखर कारखान्याजवळ असलेल्या ‘न्यू जगदंबा मराठा खानावळ’ परिसरात लिंबराज पिंजरे हा पोलिसांची नजर चुकवून चोरट्या मार्गाने देशी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस हेड कॉन्स्टेबल लतीफ पाशामियाँ सौदागर (बकल नंबर १३७६) यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ‘संतरा शिकारी’ कंपनीच्या १८० एम.एल. च्या ६ सीलबंद बाटल्या (किंमत ४८० रुपये) जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी औराद शहाजानी ठाण्यात गुरनं १६१/२०२६, कलम ६५ (ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘सुधरतील ते लिंबराज कसले?’; ३ केसेस नंतरही खानावळीच्या आडोशाला ‘पवित्र’ व्यवसाय!
कायद्याचा आदर राखणे आणि पोलिसांच्या कारवाईला घाबरणे, हा नियम सामान्य नागरिकांसाठी असतो; पण हलगऱ्याच्या लिंबराज पिंजरेला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलीस तपासात समोर आलेली त्याची ‘कुंडली’ पाहता, त्याला बेकायदेशीर दारू विकण्याची जणू सवयच जडली आहे. पोलिसांच्या खाकी वर्दीचा किंवा न्यायालयाच्या चक्रांचा त्याच्यावर काडीचाही परिणाम झालेला दिसत नाही. यापूर्वीही औराद शहाजानी पोलिसांनी त्याच्यावर छापे टाकून गुन्हे दाखल केले होते. त्याच्यावर आधीच खालील ३ गुन्हे दाखल असून ते न्यायालयात प्रलंबित (न्यायप्रविष्ठ) आहेत :
१) गुन्हा रजि. नं. १२०/२०२५ (कलम ६५ ई, म.प्रो.का.)
२) गुन्हा रजि. नं. २८/२०२६ (कलम ६५ ई, म.प्रो.का.)
३) तिसरा गुन्हा (२०२६ मधील) (कलम ६५ ई, म.प्रो.का.)
तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कडक पाऊल
आरोपी लिंबराज याच्या या अवैध धंद्यामुळे हलगरा परिसरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत असून, गावात छोट्या-मोठ्या भांडणांमुळे शांतता भंग होत आहे. आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुका आणि मोठे सण-उत्सव येत आहेत. या काळात अशा अवैध दारूमुळे नशेत भांडण-तंटे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हनुमंत बांगर यांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे.
‘कलम ९३’ अन्वये खटला; न्यायालयातून ‘इंटेरियम बॉण्ड’ घेण्याची तयारी
आरोपीने आपला अवैध धंदा पूर्णपणे बंद करावा आणि त्याचे वर्तन सुधारावे, यासाठी एपीआय हनुमंत बांगर यांनी उपविभागीय अधिकारी (निलंगा) यांच्याकडे अधिकृत अहवाल (जा.क्र. ७९०/२०२६) सादर केला आहे. या अहवालानुसार, आरोपी लिंबराज पिंजरे याच्याकडून बी.एन.एस.एस. कलम १३५ (३) (BNSS Section 135(3)) अन्वये अंतरिम जामीनपत्र (Interim Bond) घेण्यात यावे, तसेच त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतील अशा गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींच्या जामिनासह कलम ९३ म.प्रो. ऍक्ट (Section 93 M.P. Act) प्रमाणे कडक प्रतिबंधात्मक खटला चालवण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सौदागर करत असून, पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हलगरा व परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
‘महाराष्ट्र मिशन’च्या बातमीचा दणका; सावरी रोडवरील ३ पत्र्यांच्या शेडवर हातोडा, महिला वर्गाला मोठा दिलासा!
हलगरा पाटी येथील सावरी रोडवर बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या ३ पत्र्यांच्या शेडमुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत ‘महाराष्ट्र मिशन’ने मागील २ जून रोजी वृत्त प्रसिद्ध करून या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातमीची तात्काळ दखल घेत औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हनुमंत बांगर यांनी धडक कारवाई करत हे तिन्ही दारूचे शेड कायमचे बंद केले आहेत.
या ठिकाणी दररोज दारू पिण्यासाठी तळीरामांची जत्रा भरायची, ज्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला आणि शाळकरी मुलींना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. दारुड्यांमुळे सतत होणाऱ्या भांडण-तंट्यांमुळे गावातील शांतता धोक्यात आली होती. मात्र, ‘महाराष्ट्र मिशन’च्या बातमीचा दणका आणि एपीआय बांगर यांच्या तडकाफडकी कारवाईमुळे सावरी रोडवरील हा दारुड्यांचा अड्डा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. पोलिसांच्या या धाडसी भूमिकेमुळे हलगरा पाटी परिसरासह शेजारील गावपाड्यांतील महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, महिलांनी पोलिसांचे जाहीर आभार मानले आहेत.



