नीट-यूजी फेरपरीक्षेसाठी एनटीएचे व्हॉट्सॲप चॅनेल; बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट-यूजी (NEET-UG) फेरपरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केले आहे. परीक्षेशी संबंधित सर्व अधिकृत माहिती आता विद्यार्थ्यांना या चॅनेलद्वारे दिली जाणार आहे.
महत्त्वाच्या सूचना,
अधिकृत क्रमांक: एनटीएने स्पष्ट केले आहे की, केवळ +91 78 27 98 02 87 या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावरूनच संदेश पाठवले जातील. विद्यार्थ्यांनी हा क्रमांक सेव्ह करून ठेवावा.
सत्यता कशी तपासावी
कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी, तो ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ या नावाने आला आहे का आणि त्याला ‘ब्लू टिक’ (व्हिरिफिकेशन बॅज) आहे का, याची खात्री नक्की करा.
प्रवेशपत्र (Admit Card)
ज्या विद्यार्थ्यांनी २१ जूनच्या परीक्षेसाठी आधीच प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे, त्यांना पुन्हा डाउनलोड करण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेशपत्र डाउनलोड केलेले नाही, त्यांनाच एनटीएकडून एसएमएस, ईमेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवले जात आहेत.
जुने प्रवेशपत्र अवैध
३ मे रोजीच्या परीक्षेसाठी जारी करण्यात आलेले प्रवेशपत्र या फेरपरीक्षेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. अनेक उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या शहरांत नवीन परीक्षा केंद्रे देण्यात आली असल्याने, त्यांना नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करणे अनिवार्य आहे.
परीक्षार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत चॅनेलवरून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन एनटीएने केले आहे.



