
पुणे : पोटच्या गोळयाला जिन्यामध्ये फेकून पसार झाली आई खराडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी अंमलदार बनल्या दायी…अशी क्रूरता आणि मानवतेचे रुप दाखवणारी हकिकत शहरात झाली. खराडी पोलीस ठाणे हद्दीत हृदय पिळवटून टाकणारी व आई लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.
१४ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आदर्श शाळेच्या शेजारी गल्ली नंबर १ थिटेवस्ती खराडीत बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर जिन्यामध्ये एक १ दिवसाचे बालक असल्याबाबत खराडी पोलीसांना माहीती मिळाली. बिल्डिंग मालक राजेश रामचंद्र केदारी (वय ५४ ) यांनी ही माहिती दिली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी तात्काळ महिला पोलीस उप निरीक्षक माधुरी बिडवे महिला पोलिस शिपाई थोरात व मालवंडे यांना घेवून तात्काळ घटनास्थळी भेट दिली. एक दिवसाचे नवजात पुरुष जातीचे बालक जिन्यामध्ये बेवारस टाकून दिलेले आढळून आले. बालक जन्माला आलेले असल्याने पूर्णतः रक्ताने माखलेले होते. त्याचे नाळेमधून रक्त येत होते. एव्हढे असताना देखीलही बाळ जिवंत होते.
गोंडस बाळ बेवारस सोडल्याने पोलिसांना हळहळ वाटली. बाळ अलगद ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. गलांडे, घुले, डहाळे, गावडे, प्रतिभा पवार, मनिषा पवार यांनी पुढाकार घेतला. तात्काळ प्राथमिक उपचार करुन, स्तनपान देउन, स्वतः कडील स्कार्पमध्ये गुंडाळून त्यास मायेची उब दिली. एकप्रकारे जीवदान दिले.
बालकास पुढील उपचारासाठी ससून हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. बाळाची प्रकृती उत्तम आहे.
खराडी पोलीस ठाणे येथे अज्ञात इसम, महिला यांच्याविरोधात भारतीय न्याय संहीता कलम ९३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे या करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मुबारक शेख यांनीही सहभाग घेतला.
खराडी पोलिसांमुळे प्राण वाचले
महाराष्ट्रात नवजात अर्भक कचऱ्यात किंवा आडोशाला ठेवून पसार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा अशी अर्भके दगावतात. या पार्श्वभूमीवर खराडी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने एका जीवाचे प्राण वाचले.



