गुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून मोहोळ येथील सीताराम डोंगरे यांच्याकडून २०१५ ते २०१७ या कालावधीत २८ लाख रुपये उकळल्याचा संदीप शहा याच्याविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आठ वर्षानंतर पुन्हा गुण वाढवून देण्याच्या प्रकरणात सोलापूरचा संदीप शहा सीबीआयच्या जाळ्यात अडकला असून, त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढवून हवे असतील तर पैसे द्या, अशी मागणी करणाऱ्या दोघांना सीबीआयने अटक केली आहे. यांपैकी एका आरोपीचे नाव संदीप शहा असून, तो सोलापूरचा रहिवासी आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव सलीम पटेल असून, तो नवी मुंबईचा आहे. सलीम पटेल याची नवी मुंबईत शैक्षणिक संस्था आहे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शहा याने नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित गुणांबाबत चिंता असलेल्या पालकांशी संपर्क साधला आणि सरकारी महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी गुणांमध्ये फेरफार करण्याचे आश्वासन दिले. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मधील सरकारी अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी शहा याने पालकांकडे लाच मागितली आणि स्वीकारलीही. शहा याने फोन करण्यासाठी बनावट पालकांचा वापर केला. त्याद्वारे त्याने असे दाखविले की, काही पालक त्यालाच कॉल करत आहेत आणि तो गुणांमध्ये फेरफार करण्यासाठी ९० लाखांची मागणी करत आहे. अखेरीस ८७.५ लाख रुपयांवर तडजोड केली गेली, असे सीबीआयचे म्हणणे आहे.

शहा याने यापूर्वी एका पालकाकडून २५ लाख रुपये स्वीकारल्याची माहिती सीबीआयकडे होती. या चर्चेनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने स्वतःची ओळख सांगत त्याला या २५ लाख रुपयांसदर्भात विचारणा केली. त्यावेळी शहा याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून तो नवी मुंबईतील सलीम पटेलच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे अधिकाऱ्यांनी पटेल याला अटक केली.

या दोघांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यामध्ये अनेक वेळा संवाद झाला असून, अनेकांची गुणपत्रिका, प्रवेश पत्रिकांचे फोटो त्यांच्या मोबाइलमध्ये आढळून आले.पटेलच्या मोबाईलमध्ये २०२५ चा १६०० पानांचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा आहे. त्याने एका विद्यार्थ्याकडून ३२.५ लाख रुपयांची रोकड घेतली होती, तर तीन विद्यार्थ्यांकडून हवालाद्वारे ७५ लाख रुपये घेतले. त्यानंतर शहाने उमेदवारांना नोएडामध्ये नेले. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आरोपींच्या कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page