गुन्हेगारीपुणे शहरमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

हातभट्टीची दारु, मटका, जुगार,गांजा सारख्या काळ्या धंद्यांचा लोणी काळभोर मध्ये सुळसुळाट

गांजा तर मिळतो थेट पोलीस ठाण्याच्या आडोशाला

पुणे : लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत मटका, जुगार हे लोकांच्या पैशांची राखरांगोळी करणारे धंदे सुरू आहेतच, हातभट्टीची दारु, गांजा आणि गुटखा या अंमली पदार्थांचे धंदे सुध्दा राजरोसपणे सुरू आहेत. त्यात भर सेक्स रॅकेटची आहे. गांजाचा एक धंदा तर पोलीस ठाण्याच्या मागेच, पोलिसांचा आडोसा घेतल्यासारखा सुरू आहे.

शहर पोलीस दलाच्या अखत्यारीत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार आल्यानंतर अवैध धंदे कमी होण्याऐवजी फोफावत चालले आहेत. अवैध दारु आणि गांजाच्या तसेच मटका जुगारच्या नादाला लागलेल्या लोकांच्या कुटुंबाची मोठी परवड होत आहे.

स्थानिक लोकांना असलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस भाले बाई नावाची महिला खुलेआम गांजा विक्री करत आहे. पुना हॉटेलच्या शेजारी गणेश काळभोर याचा मटका जुगार अड्डा सुरू आहे. लोणी गावात पाषाणकर बाग, अमीर चिकन दुकानाच्या मागे, जालिंदर मोटर्स समोर महेश चव्हाण याचा मटका जुगार सुरू आहे.

तसेच पाषाणकर बाग, जालिंदर मोटर्स शेजारी बन्सी नावाचा माणूस होलसेल मध्ये मोठ्या प्रमाणात घाऊक गुटखा विक्री करत आहे. लोणी काळभोरसह आजूबाजूंच्या परिसरांमधून मोठ्या प्रमाणावर दुकानदार व पान टपरी वाले बन्सी कडून गुटखा घेण्यासाठी येतात.

कुंजीर वाडी येथे कॅनॉल शेजारी स्मशानभूमी जवळ भाऊ खलसे याची हातभट्टी दारू विक्री सुरु आहे. कुंजीर वाडीतच येथे कॅनॉल शेजारी स्मशानभूमी जवळ यांच खलसे याचा मटका व सोरट जुगार धंदा जोरदार सुरु आहे.

पुणे सोलापूर रोड, कुंजीरवाडी येथे एचपी पेट्रोल पंपा समोर, रॉयल एनफील्ड बुलेट गॅरेज असलेल्या बिल्डिंग मागे सुध्दा भाऊ खलसे याचा मटका जुगार अड्डा सुरु आहे. थेऊर फाटा येथे पुलाच्या खाली बेट वस्ती जवळ राखपसरे याचा मटका जुगार व सोरट जुगार सुरू आहे. थेऊर फाटा, बेट वस्ती येथे राखपसरे याचीच सर्वात मोठी अवैध दारूची भट्टी सुरू आहे.

बोस्टन चहा कॅफे मागे लिटिगेशन जागेत गणेश जेटीथोर याचा मटका जुगार सुरू आहे. पिके (रॉयल) हॉटेलमध्ये मुलींना ऑनलाइन पद्धतीने बोलावून सेक्स रॅकेट सुरू आहे.

मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या अवैध धंद्याना लोणी काळभोर मध्ये आश्रय मिळण्यामागे पोलिसांचा नक्कीच अर्थपूर्ण संबंध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

जुन्या वसूलीदादांमुळे काळे धंदे राजरोसपणे

वसूली करणाऱ्या ‘कलेक्टर’ किंवा ‘वसूली दादा ‘ नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पुणे शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसुलीवाल्यांची यादी आपल्याकडे आहे, असे सांगून संबंधितांची नियंत्रण कक्ष किंवा मुख्यालयात बदली केली होती. तथापि, लोणी काळभोर मध्ये अवैध धंदे दुप्पट झाले आहेत. त्यामागे जुना ‘वसूली दादा’च सक्रिय असल्याचे म्हटले जाते.

पोलीस आयुक्तांच्या कारवाईनंतरही वसुली दादा पुन्हा लोणी काळभोर मध्ये सक्रिय झाला कसा? त्याला वसुलीसाठी कोणत्या अधिकाऱ्याने पुढे केले? त्याला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याचा पाठिंबा आहे का? पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला हे माहीत नाही का? हे सर्व तपासून पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page