गुन्हेगारीपुणे शहरमहाराष्ट्रसामाजिक

स्वच्छ पोलीस दलाबाबत पोलीस आयुक्तांचा स्वप्न भंग, लोणीकंद हद्दीत अवैध धंदे जोमात

पुणे : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अष्टापूर , वाडेबोल्हाई, फुलगाव आदी गावामध्ये मटका, जुगार राजरोसपणे सुरू आहे. अनेक हॉटेल्स मध्ये बेकायदेशीरपणे देशी विदेशी मद्याची विक्री सुरू असून पोलिसांचे याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होताना दिसत आहे.

बेकायदेशीर गुटखा विक्री अनेक ठिकाणी सुरू आहे. लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असून त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सततच्या तक्रारींमुळे मागील आठवड्यातच यशवर्धन लॉजिंग मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. त्यामुळे स्थानिक पोलिसांना हे सर्व गैरप्रकार कसा निदर्शनात येत नाही असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

स्वप्निल नामक कारभारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना डोईजड झाला आहे, असे सांगितले जाते. संबंधित कर्मचारी या सर्व बेकायदेशीर धंद्यांना खतपाणी घालत असल्याची चर्चा पोलीस दलातच दबक्या आवाजात सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या परस्पर अवैध धंद्यांना मोकळीक देऊन त्यांच्याकडून संबंधित वसुली करत असल्याची चर्चा आहे. त्याला काळाबाजार करणारे धंदेवाईक ‘वसुलीदादा’ या नावाने ओळखतात. लोणीकंद पोलीस ठाण्याचा कारभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चालवतात की ‘वसुली दादा’ चालवतो असा प्रश्न प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांना पडला आहे.

एकुणात अमितेशकुमार यांनी पोलीस आयुक्त पदाची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर भ्रष्ट मार्गाने कमाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना चाप लावण्यासाठी वसुली करणाऱ्यांची यादीच तयार केली होती. भ्रष्ट कारभार समजताच मुख्यालयात किंवा अन्य पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षात बदली केली होती. तरीही काही लोणीकंद सारख्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे छुपेपणे सुरू असून अमितेशकुमार यांच्या सारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आयुक्तांचे स्वच्छ पोलीस दलाचे स्वप्न भंग पावत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page