
पुणे: महान तत्त्वज्ञ, विचारवंत, गूढवादी, योगी, स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि संत महर्षी न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद यांच्या रेखाचित्रकार मिलिंद रथकंठीवार यांनी रेखाटलेल्या चित्राचे अनावरण सोमवारी स.प. महाविद्यालयाजवळील ‘शांति मंदिर’ या विनोद त्यांच्या वास्तूमध्ये औपचारिक समारंभात झाले.
महर्षी विनोद यांचा उज्ज्वल अध्यात्मिक वारसा पुढे चालवणारे आत्मयोगगुरु यांच्या हस्ते रेखाचित्राचे अनावरण करण्यात आले. रथकंठीवार यांचे सहकारी, माजी राष्ट्रीय बुद्धीबळपटू प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.
महर्षी न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद यांनी ‘जागतिक शांती दूत’ म्हणून जगभर प्रवास केला. महर्षी विनोद हे डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन, बर्ट्रांड रसेल, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि भगतसिंग यांच्याशी जवळून संबंधित होते.
लेखक,गायक आदी कलांमध्ये पारंगत मिलिंद रथकंठीवार यांचे वर्णन ‘व्यक्ती एक अभिव्यक्ती अनेक’ असे केले जाते. त्यांनी देशविदेशातील प्रसिद्ध व्यक्तीमत्वांची रेखाचित्रे रेखाटली आहेत. लता मंगेशकर यांच्या पासून अनेक नामवंतांचा त्यात समावेश आहे.
आजपर्यंत त्यांनी चारशे रेखाचित्रे रेखाटली असून संबंधित व्यक्तींची किंवा त्यांच्या वंशजांची स्वाक्षरी घेऊन त्यांचा संग्रह करत अनेक प्रदर्शने भरवली आहेत.



