अग्रलेख : माणिक आणि धनिक

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला केवळ एक वर्ष झाले आहे. या काळात भाजपच्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना वेगवेगळ्या वादात अडकल्यामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. माणिक कोकाटे यांच्यापूर्वी धनंजय मुंडे यांचाही राजिनामा घेण्याची वेळ आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला राज्य विधानसभेत मोबाईल फोनवर रमी खेळताना आढळून आल्याने कोकाटे हे चर्चेत आले. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिल्याने कोकाटे आमदार म्हणून अपात्र ठरले. दोन वर्षांपूर्वी नागपूर बँक घोटाळ्यात काँग्रेस आमदार सुनील केदार यांना २२ डिसेंबरला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबरला विधिमंडळ सचिवालयाने केदार यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब करीत ते प्रतिनिधित्व करीत असलेली सावनेरची जागा रिक्त झाल्याची अधिसूचना काढली होती. असले राजकीय नेते आणि मंत्री हे सरकारच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या राजरोसपणे दरोडा टाकणारे लोक असतात आणि कोणत्या ना कोणत्या पक्षात जाऊन आपले गुन्हे दाबून ठेवत जनतेला मूर्ख बनवत राहतात हे कोकाटेंच्या उदाहरणामुळे पुढे आले आहे.
तीन दशके जुन्या गृहनिर्माण घोटाळ्याच्या प्रकरणात न्यायालयाने कोकाटेंची शिक्षा कायम ठेवली. कोकाटेंनी पदाचा राजीनामा दिला. कोकाटेंच्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी महायुती आघाडीत राजकीय गोंधळ निर्माण झाला.
कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटेंना १९९५ मध्ये एका गृहनिर्माण योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के कोट्याचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. या भावांना फसवणूक आणि बनावटगिरीसह अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.
यापूर्वी, सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली होती. काही महिन्यांपूर्वी नाशिक दंडाधिकारी न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि ५०,००० दंड ठोठावला होता. कोकाटेंनी या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, सोमवारी सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाच्या शिक्षेला कायम ठेवले. त्यानंतर दंडाधिकारी न्यायालयाने कोकाटे यांच्या अटकेचे वॉरंट जारी केले. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तातडीने सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कोकाटेंना सुनावलेली दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगित केली. त्यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
निवडणूक कायद्यानुसार, कोकाटेंना दोन वर्षांची सुनावण्यात आलेली शिक्षा व त्यांच्या दोषसिद्धीस स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार यातून लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम ८ (३) अन्वये कोकाटे हे आमदार म्हणून अपात्र ठरले आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्याचा पर्याय कोकाटेंपुढे
आहे. कोकाटेंचे कायदेशीर पथक सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत विचार करीत असल्याचे सांगण्यात आले. कोकाटे यांच्या दोषसिद्धीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तरच त्यांची आमदारकी वाचू शकेल.
कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोट्यातून क्रीडामंत्री बनले असल्याने, ही घटना उघडकीस आल्यानंतर, अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि कोकाटे यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कोकाटेंनी मंगळवारी रात्री अजित पवारांना राजीनामा सादर केला. पवारांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राजीनामा सादर केला. खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपात्रतेवर न्यायालयीन निकालपत्रे व विधिमंडळ सचिवालयाकडून सविस्तर कागदपत्रे आपल्यासमोर प्राप्त झाल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
कोकाटेंनी काँग्रेस मधून सुरुवात करुन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा दलबदलूपणा करत आपली आमदारकी ५ वेळा शाबूत ठेवली. मंत्री पदावर असताना ८४ कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्या नावावर आहे. या सर्व काळात गरीबांसाठी असलेल्या योजनेतून त्यांनी आणि त्यांच्या भावाने २ फ्लॅट गिळले. आता ते फ्लॅट त्यांच्या ताब्यातून घेऊन खऱ्या गरीब लाभार्थींना दिले तर कोकाटेंना मिळालेल्या शिक्षेचे खऱ्या अर्थाने स्वागत होईल.
राजकीय प्रवास सुरू केल्यानंतर १९९९ मध्ये माणिक कोकाटेंनी काँग्रेस सोडली आणि शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट नाकारल्यानंतर, ते शिवसेनेत गेले आणि १९९९ आणि २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. नंतर ते तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या बंडात सामील झाले आणि राणेंसोबत काँग्रेसमध्ये सामील झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर तिसऱ्यांदा सिन्नरमधून विजयी झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा भाजपमध्ये गेले आणि शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला . २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढले, शिवसेनेच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीत गेले, त्यांनी चौथ्यांदा सिन्नर विधानसभा मतदारसंघ अतिशय कमी फरकाने जिंकला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे उमेदवार उदय सांगळे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवला.
भ्रष्ट राजकीय नेते अटक टाळण्यासाठी ज्या वेगाने रुग्णालयात दाखल होतात तशाच तथाकथित प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील सुसज्ज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यामुळे त्यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाले. डॉक्टरांनी कोकाटेंना काय धाड भरली आहे हे अजून सांगितले नाही. सामान्य माणसाने हा गुन्हा केला असता तर त्याचे काय हाल झाले असते? पण राजकारणात दगड सुध्दा माणिक मोती असतो. त्यामुळे कोकाटेंना जेल मध्ये गेलेले आपण पाहू शकू की नाही ही शंका आहेच.


