आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानावरून अजित दादांचा थेट इशारा
कारणे दाखवा नोटीस पाठवणार
पुणे : अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या सततच्या वादग्रस्त विधानावरून अजितदादा चांगलेच भडकले आहेत. वारंवार समज देऊनही काही सुधारणा होत नसल्याचे दादांनी स्पष्ट करत दादा त्यांची कानउघाडणी करण्याची शक्यता आहे. जगताप यांच्यामुळे पक्षाच्या सर्वसमावेशक भूमिकेला तडा जात असल्याने यावेळी दादांनी मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने केवळ हिंदू लोकांच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे वाद ओढावला होता. त्यावर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
खरंतर अरुणकाका जगताप जोपर्यंत ह्यात होते तोपर्यंत सगळे तिथे सुरळीत होते. परंतु आता काही लोकांना आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यावेळेस आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हाही त्याला समजावून सांगितले होते. तो म्हणाला होता की, मी त्यात सुधारणा करेल. पण तो सुधारणा करताना दिसत नाही.
त्यामुळे त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी जाहीर केली. त्यामुळे संग्राम जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आणि त्यांना त्यावर त्यांची बाजू मांडावी लागेल असे समोर येत आहे.
अहिल्यानगर शहर गेल्या काही दिवसांपासून धार्मिक ध्रुवीकरणाचे केंद्र ठरत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून औरंगजेब फॅन क्लबने तिथे खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर हिंदू-मुस्लिम तणाव दिसून आला होता. करमाळा येथील हिंदू जन आक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी हिंदूंकडून करण्याचे आवाहन केले होते. दीपावली सणानिमित्त प्रत्येक नागरिकाने खरेदी केवळ हिंदूच्याच दुकानातून करावी असे त्यांचे वक्तव्य होते.



