जामखेडच्या रेणुका कला केंद्रात राडा, नर्तकीच्या तक्रारीनंतर तोडफोड
अहिल्यानगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मोहा येथील रेणुका कला केंद्रात मध्यरात्री काही टोळक्यांनी धुमाकूळ घातला. हातात धारदार शस्त्रं आणि काठ्या घेऊन गाड्यांच्या काचा फोडल्या. तसेच कलाकेंद्राच्या आवारातील किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रात प्रवेश केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. तर या राडा घालणाऱ्या टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील मोहा येथे असलेल्या रेणुका कलाकेंद्रात शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास अज्ञात १७ जणांचा जमाव तोंडाला रुमाल लावून तलवार, काठ्या कोयते घेऊन आले. त्यांनी कलाकेंद्राच्या आवारातील दुचाकी रिक्षांची तोडफोड केली.
तसेच गेटवर असलेल्या किराणा दुकानाचे काऊंटर फोडून कलाकेंद्रात प्रवेश करून तेथील होमथिएटर व लोकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्यांची तोडफोड केली. सुमारे वीस मिनिटे असा प्रकार चालू होता. सदर घटनेची माहिती जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे.
याप्रकरणी ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात १७ लोकांवर जामखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तोडफोड तीन दिवसांपूर्वी झालेल्या छेडछाड आणि मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्याचा राग मनात धरून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या तोडफोडीमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.



