शस्त्राचे सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार

मुंबई : तरुणाईमध्ये सोशल मीडियाची चांगलीच क्रेझ आहे. लाईक अन् कमेंट किती आल्या त्यावरुन आपण किती प्रसिद्ध आहोत, हे काही तरुण ठरवत असतात. मग त्यासाठी भाईगिरी करणारे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करत असतात. खरेतर अशी अनेक मुले गुंडगिरीशी, गुन्हेगारीशी संबंधित नसतात. परंतु वाढदिवस साजरा करताना केक कापण्यासाठी तलवार वापरण्यात त्यांना मजा वाटते. आता असे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणे चांगलेच महागात पडणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अवैध शस्त्र बाळगणे, स्टाईलबाजी करणे आणि धाक दाखवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे.
देशीकट्टा, पिस्तूल असो किंवा मोठा चाकू आणि खंजिर किंवा कोयता या शस्त्राचे फोटो सोशल मीडियावरती पोस्ट अपलोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणी अवैध शस्त्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांना अटक करण्यात येईल. वर्षभरात अनेकांवर कारवाई झाली. त्या लोकांना अटक करुन तडीपार किंवा ‘मोक्का’ सारखी कारवाई झाली आहे. तसेच परवानाधारक शस्त्रासोबत फोटो काढून समाजात दहशत निर्माण करणे हा सुद्धा गुन्हा आहे. शस्त्राचा परवाना स्वसंरक्षणासाठी दिला आहे. परंतु त्याचा गैरवापर करणाऱ्यांचा परवाना रद्द करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पोलीस महासंचालकांनी ठिकठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना बजावले आहे.
शस्त्र दाखवून धमकावणे किंवा अशाप्रकारे विधान करणे हे कायद्याच्या दृष्टीने किती गंभीर असू शकते, याची माहिती परिणामांची पर्वा नसणाऱ्या युवकांना नसते. एका छोट्याश्या चुकीमुळे ऐन तरुणपणी आयुष्याला वेगळे वळण लागते.
भारतीय न्याय संहिता अंतर्गत तरतुदी
पूर्वीच्या ‘भारतीय दंड संहिता’ म्हणजे आयपीसी ऐवजी आता भारतीय न्याय संहिता (बीएनएस) लागू झाली आहे. त्यातील खालील कलमे या संदर्भात महत्त्वाची आहेत.
कलम ३५१ नुसार गुन्हेगारी धमकी म्हणजे जर रागाच्या भरात कोणाला शारीरिक इजा करण्याची किंवा मारण्याची धमकी दिली म्हणजे, मी तलवार चालवेन, कोयता डोक्यात घालीन असा इशारा दिला तर तो गुन्हा ठरतो.
साध्या धमकीसाठी २ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होईल. पण जर धमकी गंभीर स्वरूपाची जीवे मारण्याची असेल, तर ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.
कलम ३५२ नुसार शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केला , सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवून दहशत निर्माण केली तर या कलमांतर्गत कारवाई होऊ शकते. शस्त्र कायदा १९५९ नुसार तलवार हे ‘शस्त्र’ या वर्गात येते. महाराष्ट्र आणि अनेक राज्यांमध्ये विशिष्ट लांबीपेक्षा जास्त मोठी तलवार बाळगण्यासाठी परवाना लागतो. पंजाब आणि दिल्ली मध्ये शीख धर्मियांसाठी हा कायदा लागू नाही.
कलम ४ आणि २५: विनापरवाना तलवार बाळगणे किंवा सार्वजनिक ठिकाणी ती उघड्यावर घेऊन फिरणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. कलम ७: प्रतिबंधित शस्त्रे बाळगण्यावर कडक निर्बंध आहेत.
महाराष्ट्र पोलीस कायदा
कलम ३७ आणि १३५ नुसार, जर जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांनी शस्त्रबंदी लागू केली असेल (जसा अनेकदा जमावबंदीचा आदेश असतो), तर साधी तलवार जवळ बाळगणे देखील गुन्हा ठरतो.
जर तुम्ही तलवार घेऊन फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि सोबत अशी धमकी दिली, किंवा तोंडी धमकी दिली तर सायबर पोलीस आणि स्थानिक पोलीस स्वत:हून गुन्हा दाखल करू शकतात. तुमच्या विधानामुळे लोकांमध्ये भीती पसरली, तरीही तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.



