ड्रग्जचा कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे लागेबांधे

मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावरी गावात (ता. जावळी) एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सुत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावरी गावाजवळच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा हा काळा धंदा सुरु होता अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सावरी गावातील ड्रग्जचा कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लागेबांधे असल्यानेच सरकार ठोस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सावरी गावात एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना सुरु होता त्याची कल्पना सातारा पोलीसांना होती पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलीस अधिक्षक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलीस अधिक्षक आहेत ज्यांनी आंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठीहल्ला केला होता. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी शिंदे व फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस व शिंदे यांनी दिले पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
कुटुंबास गोवण्याचा प्रयत्न – प्रकाश शिंदे
दरम्यान, सावरी येथील अमली पदार्थ तस्करी प्रकरणाबाबत काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप हे बिनबुडाचे, निराधार आहेत. त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. केवळ शिंदे कुटुंबाला गोवण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिले आहे.



