भीमाशंकर मंदिर ३ महिन्यांसाठी बंद

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी, तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि श्री भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने मंदिर तीन महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्ग बांधकामासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि भाविकांच्या सोयीकरिता महाशिवरात्रीला म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ हा कालावधी यामध्ये वगळण्यात आलेला असून या कालावधीत मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले राहणार आहे.




