महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१६ (१) अन्वये राज्यपालांनी ही नियुक्ती केली असून, विवेक भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी होईल तोपर्यंत) ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.
अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१६ (१-क) नुसार डॉ. अभय एकनाथ वाघ, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
कोण आहेत विवेक लक्ष्मीकांत भीमनवार?
विवेक भीमनवार हे महाराष्ट्र कॅडरचे २००९ बॅचचे आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत त्यांचा भक्कम अनुभव आहे. त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात येण्यापूर्वी एलएलबी आणि एमएससी या उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त केली आहे. विवेक भीमनवार महाराष्ट्र शासनात परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात परिवहन विभागात अनेक सुधारणा आणि नागरिकाभिमुख उपक्रम राबवण्यात आले. विशेषतः प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करत प्रशासकीय धाडस दाखवले होते.




