महाराष्ट्रमुंबईसामाजिक

मुंबईत बेस्ट बसचा अपघात; १३ जणांना चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

मुंबई : भांडुप पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन रोडवर सोमवारी रात्री थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. बेस्ट बस रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊजण जखमी झाले. जखमींवर राजावाडी व अन्य एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी बस चालकांना ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र तांत्रिक बिघाड की चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

बस अपघातातील मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, ९ प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर आहे. जखमींवर एम. टी. अग्रवाल रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, सायन रुग्णालय, मिनाज हॉस्पिटल, फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वर्षा सावंत (२५ वर्षे), मानसी मेघश्याम गुरव (४९ वर्षे), प्रशांत शिंदे (५३ वर्षे), प्रणिता संदीप रसम (३५ वर्षे) अशी मृतांचा नावे आहेत. तर नारायण भिकाजी कांबळे, मंगेश मुकुंद दुखांडे, ज्योती विष्णू शिर्के, प्रशांत दत्ताराम लाड, शीतल प्रकाश हाडवे , दिनेश विनायक सावंत, पूर्वा संदीप रसम, प्रताप गोपाळ कोरपे, रवींद्र सेवाराम घाडीगावकर आणि रामदास शंकर रूपे दोघांना किरकोळ दुखापत झाली असून प्रकृती स्थिर आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, “मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page