तीन वर्षांमध्ये १३ कोटी ८६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त, पुणे शहर पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक – १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची कामगीरी

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक १ कडून गेल्या अडीच ते तीन वर्षांमध्ये तब्बल १३ कोटी ८६ लाखांहून अधिक किंमतीचे मेफेड्रॉन, गांजा, कोकेन, चरस, आफिम बोंडाचा चुरा व पावडर असे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. खत म्हणून वापरल्या जाणाऱ्या, पण नशेसाठी वापरात असलेल्या ‘कॅथा इदुलिस’ चाही त्यात समावेश आहे. पुणे शहर विद्येचे माहेरघर आहे. देशभरातून तसेच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी पुणे शहरामध्ये येत असतात. या वाढत्या स्थलांतराबरोबरीने अंमली पदार्थांचा वापरही लक्षणीय वाढला आहे. पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी पुणे शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे ) रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- १ सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक – १ चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे अधिकारी व त्यांचे सहकारी या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी झटत आहेत. घातक अंमली पदार्थांच्या पुरवठादारांवर कारवाई आणि ज्यांना अशा नशेचे आकर्षण आहे अशी विशेषतः युवा पिढी व शालेय विद्यार्थी यांचे प्रभावी प्रबोधन अशी दुहेरी भूमिका या विभागाचे अधिकारी पार पाडत असतात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाची सूत्रे दीर्घकाळ सांभाळली आहेत. विनायक गायकवाड व त्यांचे सहकारी सहाय्यक निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते व संदेश काकडे यांच्या पथकाकडून अंमली पदार्थ विक्री बाबत खबऱ्यांकडून माहिती घेतली जाते. तसेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासारख्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना विश्वासात घेऊन गांजा,चरस, गर्द आदी अंमली पदार्थ कोठून मिळतात याची माहिती घेत संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात येतात. या विभागाने नुकत्याच आंतरराज्यीय ड्रग तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून २,२१,६०,००० किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला. आजाद शेरजमान खान (वय-३५ वर्षे, रा. पिपलखेडी, थाना बरखेड़ाकला, ता. अलोट जि. रतलाम, मध्य प्रदेश) नागेश्वर रामेश्वर प्रजापती (वय ३५ वर्षे, रा. ता. अलोट, जि. रतलाम, राज्य मध्य प्रदेश, गाव खजुरी-देवडा) व एक अल्पवयीन बालक यांचा तस्करांत समावेश आहे. पंढरीनगर, खराडी, या ठिकाणी सापळा रचून पकडण्यात आले.
अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडून तीन वर्षांमध्ये १३ कोटी ८६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त
जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये २४ केसेस करण्यात आल्या. त्यामध्ये १९,७०,९०० रुपये किंमतीचा ९९ किलो ३८१ ग्रॅम गांजा, २,५०,४९ किंमतीचे ६ किलो २५१ ग्रॅम २७३ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), ३५,२७,००० चे १७६ ग्रॅम ३५० मिलीग्रॅम कोकेन, ८०३४० रुपयांचे ८० ग्रॅम ७९० मिलीग्रॅम चरस, ७६०५० किंमतीचा ५ किलो ७ ग्रॅम आफिम बोंडाचा दोड्डा चुरा व पावडर ७,०१,३५० चे ९ किलो कॅथा इदुलिस (खत) हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. एकूण ३३ आरोपींना अटक करण्यात आली. एकूण ३ कोटी २३ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ किंवा तत्सम बंदी असलेले नशिले पदार्थ जप्त करण्यात आले.

गेल्या वर्षी, १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये एकूण ६८ केसेस करण्यात आल्या. त्यामध्ये ७० लाख १ हजारचा गांजा व ९ लाख ९१ चे अफिम, १,८६, ६०० किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) २,६४,९६,६५० किंमतीचे कोकेन, ५८ हजार किंमतीचे ब्राऊन शुगर, १,१०,००० चे एम डी एम ए आणि १लाख ८१ हजारचा चरस असा ५ लाख ३७ हजार ५९, रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. ९४ आरोपींना अटक केली होती. ४९ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा सुध्दा जप्त करण्यात आला असून बंदी असलेल्या हुक्का फ्लेवर व सिगारेट असा १० लाख ६० हजार किंमतीचा माल सुध्दा हस्तगत करण्यात आला होता. एकूण ६ कोटी ३७ लाख रुपये किंमतीचा अंमली किंवा प्रतिबंधित मुददेमाल या काळात जप्त करण्यात पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांचे सहकारी यांना यश आले.

लाॅकडाऊनचा अंमल कमी होत असतानाही अंमली पदार्थ विरोधी विभाग सक्रिय होता.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये ४० केसेस करण्यात आल्या. एकूण ७५ आरोपींना अटक करण्यात आली. २ कोटी ६ लाख ६७ हजार किंमतीच्या अंमली पदार्थांपैकी गांजा ५६ लाख ८५ हजार, कोकेन २५ लाख २४ हजार, मॅफेड्राॅन (एम डी) ४१ लाख १ हजार तसेच एम एडी एम ए ९५ हजार व एल एस डी ६५०० रुपये किंमतीचे यांचा समावेश आहे. तसेच ब्राऊन शुगर हेरॉईन/अफिमचे तुकडे/अफिम बोंडाची पावडर (दोडा चुरा) ६ लाख ८५ हजार ८०० व चरस १७ लाख ४७ हजार असे एकूण अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. २२ प्रकरणात धंदेवाईक लोकांवर कारवाई करण्यात आली. २ किलो चरस आणि ३५७ किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले. याशिवाय १६ लाख ४६ हजार रुपये किंमतीचा गुटखा ३ ठिकाणी छापे टाकून जप्त करण्यात आला.

समाज व्यसनमुक्त राहावा तसेच गर्द, कोकेन, मॅफेड्राॅन सारख्या दारुपेक्षा हजार पट जीवघेण्या पदार्थांचा विळखा तरुणांवर पडू नये यासाठी पोलीस दक्ष असतात. अशाच दक्ष विभागाने एकेकाळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र संचालक डॉ. अनिता अवचट व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट या दांपत्याच्या सहकार्याने पुणे शहर एकेकाळी गर्द पावडर मुक्त केले होते. तरीही अत्यंत घातक नवीन अंमली पदार्थ अधूनमधून डोके वर काढत असतात किंवा गांजासारख्या पारंपरिक नशेची व्याप्ती वाढत जाते व व्यसनाधीनता वाढून निरोगी समाज पोखरला जातो. अशा वेळी अंमली पदार्थ विरोधी पथक सतत सक्रिय होऊन अंमली पदार्थ जिथे मिळतात, ते अड्डे उध्वस्त करत असते किंवा बाहेरच्या राज्यातून येऊन अंमली पदार्थ विकणाऱ्यांबाबत शिताफीने माहिती मिळवून हे पदार्थ जप्त करत असते.
– श्री. विनायक गायकवाड – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक – १, पुणे शहर
कर्तव्य, मानवतावादी भूमिकेतून काम
मध्यंतरी अंमली पदार्थ विरोधी विभाग हे नाव काही घटनांमुळे बरेच चर्चेत होते. महाराष्ट्र पोलीस दलात सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये अंमली पदार्थ विरोधी विभाग सक्रिय असतो. या दलात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्तव्य आणि मानवतावादी भूमिका यांची जाणीव असेल तर ते कोणाचा तरी जीव वाचवू शकतात, नशेची चटक लागलेल्या शेकडोंना अंमली नशेच्या विळख्यातून बाहेर काढू शकतात. फक्त १५ वर्षे वय असलेल्या, संपन्न घरातल्या शाळकरी मुलाला कोठून तरी गांजाची नशा करायला मिळाली. हळूहळू अशाच प्रकारच्या नशा करणाऱ्यांची संगत वाढत गेली. काही कारणे सांगून तो घरातून पैसे घेत असे. नंतर तो गांजा,चरस,कोकेन,दारु अशा नशांच्या आहारी गेला. आई वडील दोघेही आपल्या नोकरी व्यवसायाच्या व्यापात असत. व्यसनी मुलाने पैसे मिळवण्यासाठी घरातला एकेक दागिना लंपास करायला सुरुवात केली. रात्र रात्र तो नशिल्या पार्ट्यांमध्ये दंग राहू लागला. महागडे कोकेन सारखे पदार्थ मिळवण्यासाठी त्याने घरच्या कपाटातून हळूहळू सर्व दागिने चोरुन सराफांना विकले. नशेपुरते पैसे मिळाले तरी तो खूष होत असे. काही सराफ कारणे सांगून त्याला सोन्याच्या दागिन्यांचे फारसे पैसे देत नसत. लाड पुरवणारे आई-बाप त्याच्याकडे फारसे लक्ष देत नसत. एकदा मुलाच्या आईने कपाट उघडले तेव्हा तब्बल २५ लाखांचे दागिने लंपास झाल्याचे पाहून तिला जबर धक्का बसला. आपल्याच मुलाने नशेडीपणासाठी दागिने चोरुन विकले हे समजल्यावर आई-वडिलांच्या पायाखालची जमीन हादरली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाची सुत्रे दीर्घकाळ सांभाळली आहेत. त्यांना भेटून पालकांनी या मुलाला जीवघेण्या नशेतून बाहेर काढण्यासाठी हात जोडले. विनायक गायकवाड यांनी पोलीस कार्यकक्षेच्या पलिकडे जाऊन त्या वाट चुकलेल्या मुलाला अंमली पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या अत्यंत घातक दुष्परिणामांविषयी समजावून सांगितले. कालांतराने तो मुलगा व्यसनाधीनतेतून बाहेर येऊन सुधारला आहे.




