पुणे शहर

पुण्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश: हडपसर व फुरसुंगीतील मॉलमध्ये सुरू होता मोठा गोरखधंदा!

पुणे, प्रतिनिधी : पुणे शहरात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हडपसर आणि फुरसुंगी येथील मॉलमध्ये बनावट कॉल सेंटर चालवून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हडपसर येथील ‘ॲमनोरा मॉल’ आणि फुरसुंगी भागात बनावट कॉल सेंटरद्वारे बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंगचा गोरखधंदा सुरू होता. ‘ॲपेक्स ॲच्युवर’ आणि ‘जेकेएल इंडिया सोल्युशन’ या नावाच्या कंपन्यांमार्फत हे रॅकेट चालवले जात होते. यात सुमारे १२० कर्मचारी काम करत होते. बनावट ऑनलाईन गेमिंग वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना पैसे जिंकण्याचे आमिष दाखवून ही टोळी फसवणूक करत होती.

१८ तासांची मोठी कारवाई

पोलिस उपायुक्त (परिमंडळ ०६) जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा, काळेपडळ, फुरसुंगी आणि सायबर पोलीस स्टेशनच्या पथकांनी एकत्रितपणे १० जून २०२६ रोजी ही कारवाई केली. सुमारे १८ तास चाललेल्या या धाडसत्रात पोलिसांनी शेकडो संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

आरोपींकडून पिस्तूल जप्त

या प्रकरणी संतोष दत्ता वेंजणेकर (वय ४७) आणि विनायक उर्फ दिपक मनोहर इक्के (वय ४०) या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी संतोष वेंजणेकर याच्या घरातून रोख रकमेसह एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत.

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-पोलीस आयुक्त संजय दराडे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page