नीट पीजी २०२६: विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा; परीक्षा केंद्रांच्या नियमांत बदल, आता घराच्या जवळच मिळणार केंद्र!

नवी दिल्ली : ‘नीट पीजी’ परीक्षेला बसणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता उमेदवारांना दूरच्या परीक्षा केंद्रांवर धावण्याची किंवा ऐनवेळी प्रवासाची कसरत करावी लागणार नाही. आगामी ३० ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक नवीन आणि पारदर्शक नियम लागू केले आहेत. या नव्या बदलांमुळे विद्यार्थ्यांना घराच्या जवळ परीक्षा केंद्र मिळणे, शहराची पूर्वकल्पना मिळणे, प्रत्येक प्रश्नासाठी अधिक वेळ मिळणे आणि कडक सुरक्षेची हमी मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नीट पीजी परीक्षेपूर्वी हे महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. परीक्षेची प्रक्रिया अधिक निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे तसेच विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नुकताच नीट पीजी २०२६ च्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS), तांत्रिक टीम आणि इतर संबंधित एजन्सींसोबत बैठक घेत त्यांनी परीक्षा पूर्णपणे सुरळीत व निष्पक्ष पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी नीट पीजी २०२६ साठी तब्बल २,७३,१८३ उमेदवारांनी नोंदणी केली असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.५ टक्क्यांहून अधिक आहे.
परीक्षा केंद्र निवड प्रक्रियेत ऐतिहासिक बदल
या नवीन नियमांतर्गत परीक्षा केंद्र निवड प्रक्रियेत सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केंद्रे वाटप केली जात होती, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दूरवरचे सेंटर मिळायचे. मात्र आता नवीन प्रणालीनुसार उमेदवारांना आपल्या पसंतीची ३ राज्ये निवडावी लागतील आणि पहिल्या पसंतीचे राज्य स्वतःच्या निवासस्थानाचे निवडावे लागेल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या जवळच परीक्षा केंद्र मिळण्याची खात्री होणार आहे.
पूर्वी शहर आणि केंद्राची माहिती परीक्षेच्या काही दिवस आधी मिळायची, ज्यामुळे आर्थिक भार आणि नाहक त्रास सहन करावा लागायचा. आता मात्र विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तब्बल ३ आठवडे आधी परीक्षा शहराबद्दल पूर्वकल्पना मिळणार असल्याने प्रवास आणि निवासाची योग्य व्यवस्था करणे सोपे होणार आहे.



