क्रीडापुणे शहरशैक्षणिकसामाजिक

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘जय गणेश’ पालकत्व योजना

पालकत्व योजनेतील विद्यार्थीनी, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक पूजा राऊत यांचे मत 

पुणे : पालकत्व या शब्दाचा खूप मोठा अर्थ आहे. त्याचा आधार असणे म्हणजे काय, हे मला जय गणेश पालकत्व योजनेतून समजले. गरीब आहे म्हणून तुम्ही स्वप्न पाहू शकत नाही, असे मनात ठेवू नका. तुमच्या पाठीशी बाप्पाचा आशिर्वाद आहे. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे. त्यामुळे जय गणेश पालकत्व योजना ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी योजना असल्याचे मत पालकत्व योजनेतील विद्यार्थीनी व आत्ताच्या मुंबईच्या साकीनाका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा राऊत यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, पालकत्व योजनेचे विजय भालेराव, अजय मोझर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक, ऐतिहासिक आणि देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या कलाकृतींना भरभरुन दाद मिळाली.

पूजा राऊत म्हणाल्या, तुम्ही स्वप्न बघा आणि ते साकार करण्याची तयारी या योजनेने करून घेतली आहे. येथील प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या गुणांना ओळखून त्यांना वाव देणारा आहे. योजनेतील प्रत्येक विद्यार्थी व्यक्तीमत्वाने संपन्न होऊन बाहेर पडतो, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, गरजवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत, त्यांच्या भविष्याला उज्ज्वल दिशा देणारी जय गणेश पालकत्व योजना आज समाजात परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करत आहे. जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत सन २०१० साली सुरू झालेल्या या उपक्रमाने मराठी शाळांमधील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले आहे.

ते पुढे म्हणाले, मराठी शाळांमधून ५०० पेक्षा अधिक गरजू व हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ट्रस्टने स्वीकारली आहे. या योजनेतून शिक्षण पूर्ण करून पुढे गेलेले अनेक विद्यार्थी आज तहसीलदार, पीएसआय, पीएचडीधारक, अभियंते तसेच एमएससी, बीएससी, एमए, बीकॉम आणि बीए अशा विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असून, हीच या योजनेच्या यशाची खरी पावती आहे, असे त्यांनी सांगितले. सुनील रासने, अक्षय गोडसे यांनी देखील विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page