पुणे शहरसामाजिक

बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडून ‘पाठराखण’; महिला पोलीस हवालदार निलंबित

पुणे : बुधवार पेठेतील रेड लाईट एरिया मध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करता तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी हे निलंबनाचे आदेश दिले आहेत.

बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर याबाबतची माहिती तात्काळ वरिष्ठांना देणे बंधनकारक असतानाही ही माहिती या महिला पोलीस हवालदाराने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली नाही, तसेच कुंटणखाना मालकीणी बरोबर संगणमत करत पीडित तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप या महिला पोलीस हवालदारावर करण्यात आला आहे.

मनिषा पुकाळे असे निलंबीत करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. मनिषा पुकाळे फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकात नियुक्तीस आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी ही निलंबनाची कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी रात्री एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. तिने ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात

माझ्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती तिने यावेळी दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही त्या तरुणीने केली होती.

मात्र, मदतीएवजी संबंधित महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांनी त्या तरुणीला फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेत तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी (संगनमत) झाल्याचा आरोप आहे. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देऊन हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पुणे शहर पोलीस दलासह पुणे शहरात खळबळ उडाली. बुधवार पेठेतील हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी निलंबित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page