एसटीच्या ताफ्यात नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस!

मुंबई : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ३ बाय २ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बसेसना ‘हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलीय. या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, भगव्या आणि शुभ्र पांढ-या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे जणू चालते-बोलते प्रतीक ठरणार आहेत.
अधिक आसन क्षमता, प्रवाशांना मोठा दिलासा सध्याच्या बसेसची आसन क्षमता साधारण ४० प्रवासी इतकी असताना नव्या बसेसमध्ये ५५ प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गांवर उभे राहणा-या तब्बल १५ प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषत: दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे, असे मंत्री सरनाईक म्हणाले.



