नवी दिल्लीपुणे शहरलातूर

नीट’ पेपरफुटीचा सीबीआयने केला पर्दाफाश; NTA च्या ३ विषय तज्ज्ञांनीच रचला कट, हजारो पानांचे दोषारोपपत्र दाखल! 

विशेष बातमी | महाराष्ट्र मिशन प्रतिनिधी

नवी दिल्ली / पुणे / लातूर : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेशी संबंधित असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर मोठा पर्दाफाश केला आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या हजारो पानांच्या दोषारोपपत्रातून (Chargesheet) या घोटाळ्यातील अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यांच्यावर गोपनीयतेची जबाबदारी होती, त्याच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) गोपनीय कमिटीतील ३ मुख्य विषय तज्ज्ञांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ‘पेपरफुटीची सप्लाय चेन’ तयार केल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले आहे.

गोपनीय विभागातून प्रश्न चोरीला; NTA तज्ज्ञांचाच मास्टरप्लॅन

सीबीआयच्या तपासांनुसार, एनटीएच्या गोपनीयता विभागाचा गैरफायदा घेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही मुख्य विषयांचे प्रश्न बाहेर काढण्यात आले.

भौतिकशास्त्र (Physics): एनटीएमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ असलेल्या हवालदार यांनी प्रश्नांचे भाषांतर आणि प्रूफरीडिंगचे काम केले. दिल्लीतील गोपनीय विभागातून निवासाच्या ठिकाणी परतल्यानंतर त्या आठवणीनुसार प्रश्न कागदावर लिहून काढत असत. हे प्रश्न त्यांनी पुण्यातील कोचिंग सेंटरमधील भौतिकशास्त्राचे शिक्षक तेजस शाह यांच्यापर्यंत पोहोचवले.

जीवशास्त्र (Biology): जीवशास्त्राच्या तज्ज्ञ मनिषा मांढरे यांनी पुण्यातील ब्युटी पार्लरच्या मालक आणि मध्यस्थ मनिषा वाघमारे यांना प्रश्न पाठवले. वाघमारे यांनी हे प्रश्न धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांच्यामार्फत हरियाणातील गुरुग्राम येथील यश यादव, तसेच जयपूरमधील मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल व विकास बिवाल यांच्यापर्यंत पोहोचवून वितरित केले.

रसायनशास्त्र (Chemistry): रसायनशास्त्राचे तज्ज्ञ प्रल्हाद कुलकर्णी यांनी आणखी वेगळी क्लृप्ती वापरली. “रफ वर्क” साठी मिळणाऱ्या कागदाच्या कपट्यांवर त्यांनी प्रश्न आणि उत्तरे लिहून काढली. दिल्लीतील हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी हे सोपे प्रश्न पूर्ण लिहून काढले. हे प्रश्न दोन मार्गांनी लीक करण्यात आले—पहिला मार्ग मध्यस्थ मनिषा वाघमारे यांच्यामार्फत, तर दुसऱ्या मार्गात लातूरचे डॉ. मनोज शिरुरे यांचा सहभाग होता. डॉ. शिरुरे यांनी हे प्रश्न लातूर येथील ‘आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूट’चे (RCC) मालक शिवराज मोटेगावकर यांच्याकडे पाठवल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे.

कागदाच्या कपट्यांपासून ते हॉटेलपर्यंत… असा रचला कट

गोपनीय कक्षात मिळालेल्या रफ पेपरच्या चिंध्यांवर प्रश्न टिपणे, हॉटेलमध्ये परतल्यावर आठवून प्रश्न कागदावर उतरवणे आणि विविध मध्यस्थांमार्फत कोचिंग क्लासेसच्या मालकांपर्यंत ते पोहोचवणे, असा आंतरराज्यीय कट रचण्यात आला होता. या नेटवर्कचे जाळे पुणे (कोचिंग क्लासेस व ब्युटी पार्लर मालक), लातूर (डॉक्टर व RCC कोचिंग इन्स्टिट्यूट), दिल्ली, हरियाणा (गुरुग्राम) आणि राजस्थान (जयपूर) अशा अनेक राज्यांमध्ये पसरल्याचे सीबीआय चार्जशीटमध्ये उघड झाले आहे.

या प्रकरणातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात असून, सीबीआयच्या या तपासाने परीक्षा यंत्रणेतील गोपनीयतेचे धिंडवडे उघडे पडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page