महाराष्ट्रराष्ट्रीय

व्हीएसआर कंपनीच्या विमानांची सुरक्षा रामभरोसे; विमानाच्या उड्डाणादरम्यान पायलट च्या जागेवर व्हीएसआर चा मालक रोहित सिंह झोपला!

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी २०२६ रोजी अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानंतर आता या अपघाताभोवतीचे गूढ अधिक गडद झाले आहे. अजित पवारांच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर आता त्यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

जय पवार यांनी नुकतीच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानात अजित पवार यांचा अन्त झाला, त्या कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप केले आहेत. जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये, व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंह हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विमान आकाशात असताना रोहित सिंह चक्क झोपलेला आहे. त्यामुळे व्हीएसआर कंपनीच्या विमानांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर येत आहे. या गंभीर निष्काळजीपणावर जय पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

जय पवार यांनी हा व्हीडीओ पोस्ट करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. माझ्या वडिलांना आपण गमावले ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हीडीओमध्ये व्हीएसआरचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी डीजीसीएला ठामपणे मागणी करतो. या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमाने तात्काळ ग्राऊंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असे जय पवार यांनी म्हटले आहे.

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

दरम्यान जय पवार यांच्या या पोस्टनंतर आता व्हीएसआर कंपनीवर टीकेची झोड उठताना दिसत आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच याप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे आता जय पवारांनी शेअर केलेल्या व्हीडीओनंतर तरी दोषींवर गुन्हा दाखल होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page