आंबेगावात वेश्याव्यवसायातून मुलीची सुटका २ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल; मात्र आरोपींच्या नावाबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद
पुणे : आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ‘वॉव लॉज’ येथे अचानक छापा टाकून आरोपींनी वेश्याव्यवसायासाठी “वॉव लॉज” मध्ये आणलेल्या पिडीत महिलेची सुटका करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन एजंट मुलींना वेश्याव्यसायासाठी आणून वेश्याव्यवसाय करुन घेत आहेत. सदर बाबत अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहकाच्या साहयाने खात्री करण्यात आली.
सदर प्रकरणी आरोपी विरुध्द पुणे येथे गु.र.नं.६४/२०२६ भा.न्या.सं. १४३ (१) (२), ३ (५) दि.१८/०२/२०२६ अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-३, शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव, रेश्मा कंक, अविनाश कोंडे, उप निरीक्षक हिरेमठ यांनी सहभाग घेतला.
ठेवा नावे दडवून
दरम्यान, किरकोळ गुन्ह्यांची सविस्तर माहिती देणाऱ्या पोलिसांनी अनेक वेश्याव्यवसायावरील छाप्यात आरोपींना अभय दिले की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आंबेगाव मध्ये झालेल्या कारवाईतही आरोपींचे नाव उघड करण्यात आले नसल्याचे काय कारण आहे? पोलीस आयुक्तालयातील माहिती आणि जनसंपर्क कार्यालय किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातर्फे प्रेस नोट तयार करण्यात येतात. नेमकी नावे पोलीस ठाण्यात दडवली जातात की पोलीस आयुक्त कार्यालयात याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.



