नांदेडमध्ये उन्हाचा तडाखा: राजेंद्रनगर भागात इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग; वाहन जळून खाक

नांदेड : राज्यात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून मराठवाड्यातही तापमानाचा पारा सातत्याने वर सरकत आहे. नांदेड जिल्ह्यात आज तापमानाचा पारा तब्बल ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. याच दरम्यान वाढत्या तीव्र उष्णतेमुळे नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील राजेंद्रनगर भागात एका इलेक्ट्रिक दुचाकीला (EV) अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुचाकी संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.
आज दुपारच्या सुमारास राजेंद्रनगर परिसरात एका घरासमोर इलेक्ट्रिक दुचाकी वाहनातून धूर निघू लागला. काही क्षणातच या धुराचे रुपांतर मोठ्या आगीत झाले आणि दुचाकीने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ नांदेड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुचाकीचा केवळ सांगाडाच उरला होता.



