पुणे शहर

रील स्टार संतोष पंडितला महिला पत्रकाराशी गैरवर्तन महागात

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : सोशल मीडियावरील स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित यांच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषा वापरणे, कपड्यांवरून अश्लील टिप्पणी करणे, तसेच तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला. टिळक रस्त्यावर ही घटना घडली.

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा निषेध करण्यासाठी एस पी महाविद्यालयाजवळ आंदोलन ठेवण्यात आले होते. संबंधित पत्रकार तरुणी आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी त्या ठिकाणी गेल्या होत्या. याचवेळी पंडित घटनास्थळी आले. आणि पत्रकारांवर संताप व्यक्त करत बोलू लागले. वाहतूक कोंडी होत असताना आंदोलन केले जात असल्याचा त्यांचा आक्षेप होता. त्याने या महिला पत्रकाराच्या अंगावरील कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली. तसेच तिच्याकडे अपमानास्पद नजरेने पाहत अश्लील हावभाव केले. इतकेच नव्हे, तर तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे.

याशिवाय, आंदोलनात सहभागी झालेल्या इतर महिलांकडेही संतोष पंडितने आक्रमकपणे धाव घेत दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून पर्वती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७५,७८,३५२, ३५१, २९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page