पुणे शहर

जिल्हा न्यायालयात भेडसावणाऱ्या समस्यांची जिल्हा न्यायाधीशांकडून पाहणी

बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तासभर फेरफटका 

पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात भेडसावणाऱ्या समस्या उणीवा आणि त्रुटी यांची पाहणी पुणे बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनी जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या सोबत सोमवारी केली. यावेळी महाजन यांनी तात्काळ संबंधित त्रुटी दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परिसरात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत संयुक्त पाहणीची मागणी केली होती. ११ ते १२ यावेळी महाजन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच पुणे महानगरपालिकेच्या व न्यायालयाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.राम भुजबळ, उपाध्यक्ष ॲड. कांताराम नप्ते, ॲड. प्रतापराव मोरे ॲड. प्रितीसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

परिसरामध्ये बांधकाम सुरू असल्याने धूळ उडून सर्वत्र घाण पसरलेली आहे. राडारोडा पडून आहे. अनेक महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आवारात लावण्यात आलेले फलक जागीच आहेत. तसेच न्यायालयाच्या आवारात मोकाट भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होत आहे, असे या वेळी निदर्शनास आणून देण्यात आले. नवीन बिल्डिंग मधील महिला बार रुम मध्ये स्वच्छता गृहात पाण्याची समस्या असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी पाण्याची नवीन टाकी बसवून देण्यासाठी महाजन यांनी सूचना केली.

वकिलांची दुचाकी वाहने उभी करण्यासाठी पांढरे पट्टे आखून दिले जावेत, तसेच पिण्याच्या शुध्द पाण्याची उपलब्धता करून दिली जावी बंद कुलर सुरू करावेत, दिवाणी न्यायालयात पिण्याच्या पाण्याची जादा सोय उपलब्ध केली जावी, झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत त्या दूर कराव्यात अशी विनंती करण्यात आली. पोलिसांच्या आरोपींची ने आण करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र सुविधा करावी या मागण्यांवर काम केले जाईल असे महाजन यांनी सांगितले.

अशोका हाॅल समोरच्या हिरवळीवर कामकाजाच्या दिवशी दुपारी पाणी सोडले जाते त्यामुळे वकिलांना जेवण्यासाठी बसण्याची जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे सुटीच्या दिवशी हिरवळीवर पाणी सोडले जावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सचिव ॲड. सम्राट जांभुळकर आणि ॲड. अभिजीत पोळ, ॲड. पूजा पवार, खजिनदार ॲड. अंजली बांदल, आॅडीटर ॲड.शिवराज निंबाळकर, ॲड. नेहा जांभळे तसेच कार्यकारिणी सदस्य मयुर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रितेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे, संध्या रायबोले, शितल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियंका घाडगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page