
पुणे : शहरातील मध्यवर्ती रेड लाईट भागातील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा अर्धनग्न व्हिडिओ काढून स्टींग ऑपरेशनचे गोंडस नाव देणाऱ्या तथाकथित पत्रकार रोहन कदम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा. तसेच हे स्टींग ऑपरेशन घडवून आणण्यासाठी नामांकित ३ पत्रकारांनी एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याकडून तब्बल २५ लाख रूपयांची सुपारी घेतली. दरम्यान, भोंदू खरातला आम्ही उघडे पाडल्यानंतर आमच्यासोबत बदला घेण्यासाठी डाव रचला गेला. त्यामुळेच याची चौकशी करून पत्रकारांसह त्या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रूपाली पाटील -ठोंबरे, विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
रूपाली पाटील म्हणाल्या, भोंदू खरात प्रकरण उजेडात आणण्यासाठी आम्ही मोठे कष्ट केले. त्या प्रकरणात शून्य झालेला बाईला हाताशी धरून मला बदनाम करण्यासाठी पुण्यातील तीन नामांकित पत्रकारांनी डाव रचला होता. त्यासाठी २५ लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार पत्रकार रोहन कदम हा बुधवार पेठेतील लॉजमध्ये गेला. त्याठिकाणी त्याने महिलेचा अर्धनग्न व्हिडिओ शुट केला असता तो पकडला. त्यामुळे त्या महिलेने त्याला बेदम मारले. त्यानंतर महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करून आरोपीविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
दरम्यान, पत्रकार रोहन कदम याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित महिलेने याबाबत जबाब नोंदवला होता.
स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली संबंधित पत्रकार रोहन कदम याने महिलेचे परवानगीशिवाय अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत संबंधितावर गुन्हा नोंदवला आहे.
याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी त्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, कोणालाही पाठीशी घालू नये, अशा कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही. अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे.



