मुंबईशैक्षणिक

एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्याला २२ हजारांची लाच घेताना पकडले

मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे (वय ५५) यांना २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले होते. नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील सुमारे ३.१६ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आहिरे यांनी ७ टक्के कमिशन म्हणून २२,१७६ रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. ही मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.

२५ मार्च रोजी तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर ६ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली आणि लाच मागणीची खात्री पटली. त्यानंतर ७ एप्रिल रोजी सापळा रचून आहिरे यांना त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page